‘जीईएम’वरुन खरेदी 2 लाख कोटींच्या घरात
विविध मंत्रालय व विभागांमधील खरेदी आकडेवारींचा समावेश
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतामधील विविध राज्यांची मंत्रालये आणि अन्य विभागांच्या खरेदीत वाढ झाल्यामुळे, चालू आर्थिक वर्षात सरकारी ई-मार्केटप्लेस (जीईएम) वरून वस्तू व सेवांच्या खरेदीने आतापर्यंत 2 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. केंद्र सरकारची सर्व मंत्रालये आणि विभागांकडून वस्तू आणि सेवांच्या ऑनलाइन खरेदीसाठी 9 ऑगस्ट 2016 रोजी जीईएम पोर्टलची सुरुवात करण्यात आली आहे.
वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर लिहिले की, जीईएमसाठी एक ऐतिहासिक यश आहे. 2023-24 च्या केवळ आठ महिन्यांत या प्लॅटफॉर्मवरून खरेदीचा आकडा 2 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेला आहे.
2021-22 या आर्थिक वर्षात खरेदी किंमत 1.06 लाख कोटी रुपये होती. गेल्या आर्थिक वर्षात ती 2 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेली होती आणि चालू आर्थिक वर्षात ती 3 लाख कोटी रुपयांच्या पुढे जाऊ शकते.
जीईएममध्ये 63,000 हून अधिक सरकारी खरेदीदार संस्था आणि 62 लाखांहून अधिक विक्रेते आणि सेवा प्रदाते आहेत. सध्या सरकारी विभाग, मंत्रालये, सार्वजनिक क्षेत्रातील युनिट्स, राज्य सरकारे आणि केंद्रीय सशस्त्र पोलिस दलांनाही आता या पोर्टलद्वारे व्यवहार करण्याची परवानगी प्राप्त झाली आहे.