महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

पुराणातली वांगी पुराणात

06:46 AM Jul 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अध्याय दुसरा

Advertisement

बाप्पा म्हणाले, कर्मत्याग करण्याच्या भानगडीत न पडता वाट्याला आलेलं कर्म निरपेक्षतेनं करावं हे सगळ्यात उत्तम. त्यानं कर्मयोग साधला जातो. त्यातून पापपुण्याचा कर्मबंध निर्माण होत नाही. म्हणजेच कर्मबंधातून मुक्त झाल्यामुळे मनुष्य जिवंतपणीच मोक्षस्थिती अनुभवू शकतो. इथपर्यंतच बाप्पाचं सांगणं आपण समजून घेतलं. पुढं बाप्पा सांगतायत की, ईश्वराने दिलेलं काम हे त्याचंच असतं आणि आपल्यावर ते त्यानं सांगितल्याप्रमाणे करायची जबाबदारी असते. मग ते सुरू झालं की, ईश्वराला सांगून टाकायचं की, तू काम करायची जेव्हढी प्रेरणा देशील तेव्हढं काम केलं की, माझी जबाबदारी संपली. ह्याच्या यशापयशाचा तूच धनी आहेस. तेव्हा तुला योग्य वाटेल तसा निर्णय घे. यालाच कर्म ईश्वराला अर्पण करणे असं म्हणतात. अशा पद्धतीने केलेलं कर्म ईश्वराला अर्पण करून होणाऱ्या नफा नुकसानीची जबाबदारी त्याच्यावर ढकलून मोकळा हो. तू हे लक्षात घेत नसल्याने काय होतंय पहा. तुला दिलेल्या कामात यश आलं की खुश होऊन हुरळून जातोस. अपयश आलं की, आपल्यामुळे झालं असं समजून दु:खी होतोस. हे सगळं तू स्वत:ला कर्ता समजत असल्याने केलेल्या कर्मातून अपेक्षा बाळगल्यामुळं होतं पण मुळातच कर्म तुझं नाही. तू कर्ताही नाहीस मग त्यातून अपेक्षा बाळगणं चुकीचं नाही का? तेव्हा निरपेक्षतेनं कर्म कर आणि मला अर्पण कर म्हणजे तू सदासमाधानी राहशील. आपण करत असलेलं कर्म ईश्वराचे असून ते करून झाल्यावर त्याला अर्पण करायचे आहे हे लक्षात राहण्यासाठी कर्म करत असताना सतत ईश्वराचे स्मरण करावे. अशा पद्धतीने तू कर्म करू लागलास की कर्माच्या सुरवातीपासून तुला आनंद मिळायला सुरवात होईल.

Advertisement

बाप्पा वारंवार हे सांगत आहेत की, वाट्याला आलेले कर्म करून ते ईश्वराला अर्पण करावे अगदी त्याचे मिळालेले फळही ईश्वराला अर्पण करावे म्हणजे कर्मबंधनातून सुटका होऊन जन्ममरणाचे चक्र थांबते आणि माणसाला मुक्ती मिळते. अर्थात जन्ममरणाचा फेरा चुकवण्याची ही युक्ती आपल्या सर्वच धर्मग्रंथातून सांगितलेली आहे. आपली पुराणेही तेच सांगतात पण असं जरी असलं तरी माणसाच्या विचारसरणीत फारसा फरक पडत नाही. तो हे सर्व तत्वज्ञान एका कानाने ऐकतो आणि दुसऱ्या कानाने सोडून देतो. देवळात ऐकलेले कीर्तन, प्रवचन, पुराण श्रवण तो देवळातून बाहेर पडला की सोयीस्कर विसरून जातो आणि कर्मफलाच्या चिंतेत बुडून जातो. कुणी त्याला विचारलं की, देवळात ऐकलेलं तुला पटलं नाही का? तर म्हणतो अशी तत्वज्ञाने मी खूप ऐकली आहेत पण त्याने कुठे पोट भरते का? घरेदारे होतात का? त्यासाठी अधिक धन लागते आणि ते मिळवण्यासाठी भलीवाईट कर्मे करावीच लागतात. देवळात कथा कीर्तन ऐकायला पुराण श्रवण करायला जातो ते केवळ करमणूक म्हणून पण बाहेर पडला की, ते सर्व विसरून जातो आणि म्हणून तर आपल्याकडे वाक्प्रचार रूढ झाला आहे की, पुराणातली वांगी पुराणात म्हणजे पुराणातल्या गोष्टी तेव्हढ्यापुरत्याच असतात आणि तेच खरे आहे.

परोपरीने समजावून सांगूनही मनुष्याला कर्मफळाचा मोह सुटत नाही हे बाप्पा चांगलंच ओळखून आहेत म्हणून ते पुन्हा एकदा सांगून माणसाला सावध करतात,

मदर्थे यानि कर्माणि तानि बध्नन्ति न क्वचित् ।

सवासनमिदं कर्म बध्नाति देहिनं बलात् ।। 9 ।।

अर्थ-मत्प्रीत्यर्थ केलेली कर्मे कधीही बद्ध करीत नाहीत. वासनापूर्वक असलेले जे कर्म ते प्राण्याला हटकून बद्ध करते.

विवरण-बाप्पा म्हणतात, अरे तू कर्मे माझी समजून माझ्यासाठी म्हणून कर म्हणजे ती तुला पाप पुण्याच्या बंधनात जखडणार नाहीत. तुझ्या इच्छेनुसार किंवा तुला करावंसं वाटतंय म्हणून तू कर्म केलंस ना तर तू अडकलास म्हणून समज आणि हे बंधनच तुझ्या पुनर्जन्मास कारणीभूत ठरते.

क्रमश:

 

Advertisement
Tags :
##tarunbharat#akaluj #tarunbharatnews#social media
Next Article