पंजाबचा सामना आज राजस्थानशी
वृत्तसंस्था/ जयपूर
पंजाब किंग्स आज रविवारी जयपूरमध्ये राजस्थान रॉयल्सविऊद्धच्या सामन्यात आणखी एक दमदार कामगिरी करून प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करेल. दुसरीकडे, राजस्थानला या हंगामात सर्व संसाधने असूनही चमक दाखविण्यात अपयश आले आहे.
आठवडाभराच्या सक्तीच्या विश्रांतीनंतर सवाई मानसिंग स्टेडियमवर उतरताना श्रेयस अय्यरच्या संघाला 8 मे रोजीची घडामोड विसरून पुढे जाण्याची आशा असेल. भारत-पाकिस्तान तणावामुळे धर्मशाला येथील त्यांचा दिल्ली कॅपिटल्सविऊद्धचा सामना रद्द करावा लागला होता. पंजाब 11 सामन्यांमधून 15 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. जरी ऑस्ट्रेलियन मार्कस स्टोइनिस आणि जोश इंग्लिस यांनी पुन्हा संघात सामील होण्यास सहमती दर्शविली असली, तरी आयपीएल पुन्हा सुरू झाल्यानंतरच्या या पहिल्या सामन्यास ते मुकतील. यामुळे पंजाब संघाला त्यांच्या फलंदाजीच्या क्रमात बदल करावा लागू शकतो.
क्रिकेट साउथ आफ्रिकाने परत बोलावलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाज मार्को जॅनसेनच्या अनुपस्थितीमुळे श्रेयसच्या संघाचे सर्वांत जास्त नुकसान होईल. तथापि, त्यांच्याकडे कर्णधार श्रेयस अय्यर, सलामीवीर प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग आणि नेहल वधेरा यांच्यासह मजबूत संघ आहे. गोलंदाजीच्या आघाडीवरही पंजाबकडे आघाडीचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग आणि फॉर्ममध्ये असलेला फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल आहेत. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काइल जेमिसन जखमी लॉकी फर्ग्युसनच्या जागी येत असल्याने पंजाब पुढील सामन्यापासून अधिक संतुलित संघ उतरवू शकेल. दुसरीकडे, यजमान राजस्थान संघ आधीच प्ले-ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे आणि सध्या 12 सामन्यांतून फक्त तीन विजयांसह नवव्या स्थानावर आहे.
संघ : राजस्थान रॉयल्स : संजू सॅमसन (कर्णधार), अशोक शर्मा, नांद्रे बर्गर, तुषार देशपांडे, शुभम दुबे, फझलहक फारूकी, वानिंदू हसरंगा, शिमरोन हेटमायर, यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, क्वेना मफाका, रियान पराग, लुआन-ड्रे प्रिटोरियस, कुणाल सिंह राठोड, वैभव सूर्यवंशी, महेश थीक्षाना, युधवीर सिंग.
पंजाब किंग्स : श्रेयस अय्यर (कर्णधार), अर्शदीप सिंग, प्रियांश आर्य, पायला अविनाश, अजमतुल्ला ओमरझाई, झेवियर बार्टलेट, युजवेंद्र चहल, प्रवीण दुबे, एरोन हार्डी, हरनूर सिंग, हरप्रीत ब्रार, जोश इंग्लिस, काइल जेमिसन, मुशीर खान, मिचेल ओवेन, प्रभसिमरन सिंग, कुलदीप सेन, शशांक सिंग, मार्कस स्टॉइनिस, सूर्यांश शेडगे, विष्णू विनोद, विजयकुमार वैशाख, नेहल वढेरा, यश ठाकूर.