पंजाब विधानसभेत अग्निपथ विरोधात प्रस्ताव संमत
पंजाब विद्यापीठप्रकरणीही केंद्राविरोधात प्रस्ताव
वृत्तसंस्था /चंदीगड
पंजाब विद्यापीठात केंद्र सरकारचा कथित हस्तक्षेप आणि ते केंद्राच्या अधीन करण्याच्या विरोधात पंजाब विधानसभेत एक प्रस्ताव संमत करण्यात आला आहे. विद्यापीठ केंद्राच्या अधीन न करण्यावरून सभागृहात शिक्षणमंत्री गुरमीत सिंह मीत हेयर यांनी मांडलेला प्रस्ताव संमत झाला आहे. त्यानंतर मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सैन्यातील अग्निपथ योजनेच्या विरोधात प्रस्ताव मांडत केंद्र सरकारला ही योजना मागे घेण्याचे आवाहन केले आहे.
सभागृहातील भाजपच्या दोन सदस्यांनी या प्रस्तांवाना विरोध दर्शविला. तर अन्य पक्षांच्या सदस्यांनी प्रस्तावाला समर्थन दिले आहे. पंजाब विद्यापीठाच्या सिनेटमध्ये 2 आमदारही सामील होतील असेही प्रस्तावात नमूद आहे. या आमदारांची नावे ठरविण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्ष कुलतार संधवां यांना देण्यात आला आहे. मुख्यमंत्री भगवंत मान यांनी यापूर्वी अग्निपथ योजना म्हणजे केंद्र सरकारचे तर्कहीन पाऊल ठरविले होते. भारतीय सशस्त्र दलांना यामुळे नुकसान पोहोचणार असल्याचा आरोप मान यांनी केला होता. सशस्त्र दलांमध्ये भरतीसाठी अग्निपथ योजनेसाठी आतापर्यंत 2 लाख तरुण-तरुणींनी अर्ज भरला आहे.