For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

होम ग्राऊंडवर पंजाबच ‘किंग’

05:55 AM Mar 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
होम ग्राऊंडवर पंजाबच ‘किंग’
Advertisement

सलामीच्या सामन्यात दिल्ली 4 विकेट्सनी पराभूत : कमबॅक सामन्यात  ऋषभ पंतला झटका  

Advertisement

वृत्तसंस्था/ मुल्लानपूर, चंदीगड

यंदाच्या आयपीएलमधील दुसरा सामना शनिवारी महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, चंदिगड येथे पार पडला. या सामन्यात पंजाब किंग्जने सॅम करनचे दमदार अर्धशतक व लिव्हिंगस्टोनच्या फटकेबाजीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सवर 4 विकेट्सनी मात करत आपला पहिला विजय नोंदवला. अभिषेक पोरेलच्या वादळी खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना 9 बाद 174 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पंजाब किंग्जने 19.2 षटकांत 6 गडी गमावून विजय मिळवला.

Advertisement

कर्णधार शिखर धवनने 175 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या पंजाब किंग्जला वेगवान सुरुवात करून दिली. त्याने 16 चेंडूत 22 धावा केल्या. मात्र  शिखर धवनचा इशांत शर्माने त्रिफळा उडवत पंजाबला पहिला धक्का दिला. तर जॉनी बेअरस्टोही 3 चेंडूत 9 धावा करत धावबाद झाला. यानंतर प्रभसिमरन आणि सॅम करन यांनी तिसऱ्या विकेटसाठी 42 धावांची भागीदारी रचत संघाला सावरले. ही जोडी जमलेली असतानाच कुलदीप यादवने प्रभसिमरनला 26 धावांवर बाद करत पंजाबला मोठा धक्का दिला. जितेश शर्माही फार काळ मैदानावर टिकला नाही.

सॅम करनचे अर्धशतक, लिव्हिंगस्टोनचीही फटकेबाजी

एकवेळ पंजाबने 100 धावांत 4 विकेट गमावल्या होत्या. यावेळी सॅम करनने लियाम लिव्हिंगस्टोनच्या साथीने डावाला आकार दिला. दोघांनी दिल्लीच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. ईशांत शर्मा दुखापतग्रस्त झाल्यामुळे दिल्लीची गोलंदाजी कमकुवत झाली होती. त्याचा फायदा सॅम करन आणि लिव्हिंगस्टोन यांनी घेतला. दोघांनी 42 चेंडूमध्ये 67 धावांची भागिदारी केली. सॅम करनने 47 चेंडूंत 6 चौकार आणि 1 षटकारासह 63 धावा केल्या. तर लिव्हिंगस्टोनने नाबाद 38 धावा केल्या. लिव्हिंगस्टोनने 21 चेंडूंच्या खेळीत 2 चौकार आणि 3 षटकार ठोकले. 19 व्या षटकांत लागोपाठ दोन विकेट गेल्याने पंजाबला टेन्शन आले होते पण लिव्हिंगस्टोननेच शेवटच्या षटकात सुमित कुमारच्या चेंडूवर विजयी षटकार ठोकला. दिल्लीकडून खलील अहमद आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.

कमबॅक सामन्यात ऋषभ पंतला झटका

प्रारंभी, पंजाबचा कर्णधार शिखर धवनने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात चांगली झाली. मिचेल मार्श आणि डेव्हिड वॉर्नर यांनी पहिल्या विकेटसाठी 3 षटकात 39 धावांची भागीदारी केली. मात्र, दोन्ही सलामीवीरांना त्यांचा डाव फारसा वाढवता आला नाही. मार्शने 20 आणि वॉर्नरने 29 धावा केल्या. यानंतर शाई होपने शानदार फलंदाजी केली आणि काही मोठे फटके मारले. पण तोही मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरला. होपने 25 चेंडूत 2 चौकार व 2 षटकारासह 33 धावा केल्या. 454 दिवसांनंतर मैदानात परतलेल्या कर्णधार ऋषभ पंतकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, पण तो केवळ 18 धावा करून बाद झाला. रिकी भुई आणि ट्रिस्टन स्टब्स यांना मोठी खेळी करता आली नाही. रिकी भुई 3 तर स्टब्स 5 धावा काढून बाद झाले. अक्षर पटेलने 13 चेंडूमध्ये 21 धावांची महत्वाची खेळी केली. यामध्ये दोन चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता.

शेवटच्या षटकात अभिषेक पोरेलचा जलवा

झटपट विकेट पडल्यामुळे दिल्लीने अभिषेक पोरेलला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानात उतरवले. यावेळी त्याने आपला इम्पॅक्ट दाखवून दिला. इम्पॅक्ट प्लेयर म्हणून मैदानात आलेल्या अभिषेक पोरेलने हर्षल पटेलने टाकलेल्या 20 व्या षटकात 25 धावा ठोकल्या. पोरेलने शेवटच्या षटकात 3 चौकार आणि 2 षटकार मारले. ज्यामुळे दिल्लीला 9 बाद 174 धावापर्यंत मजल मारता आली. पोरेलने अवघ्या 10 चेंडूत नाबाद 32 फटकावल्या. पंजाब किंग्जकडून हर्षल पटेल आणि अर्शदीप सिंगने 2-2 विकेट्स घेतल्या. याशिवाय कागिसो रबाडा, हरप्रीत ब्रार आणि राहुल चहर यांनी 1-1 विकेट घेतली.

दीड वर्षानंतर कमबॅक करणाऱ्या ऋषभ पंतचे टाळ्याच्या गजरात स्वागत

दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने अपघातातून सावरल्यानंतर या सामन्यातून क्रिकेटमध्ये तब्बल 454 दिवसांनी पुनरागमन केले आहे. डेव्हिड वॉर्नर बाद झाल्यानंतर जेव्हा पंत फलंदाजी आला, तेव्हा स्टेडियममध्ये सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकांकडूनही त्याचे उभे राहून टाळ्यांच्या गजरात स्वागत झाले. पुनरागमानंतर फलंदाजी करताना 13 चेंडूत 2 चौकारांसह 18 धावांची खेळी केली. तसेच त्याने नंतर यष्टीरक्षणही केले.

संक्षिप्त धावफलक : दिल्ली 20 षटकात 9 बाद 174 (डेव्हिड वॉर्नर 29, शाय होप 33, ऋषभ पंत 18, अभिषेक पोरेल 10 चेंडूत नाबाद 32, हर्षल पटेल व अर्शदीप सिंग प्रत्येकी दोन बळी).

पंजाब किंग्ज 19.2 षटकांत 6 बाद 177 (शिखर धवन 22, सॅम करन 63, लिव्हिंगस्टोन नाबाद 38, खलील अहमद व कुलदीप यादव प्रत्येकी दोन बळी)

Advertisement
Tags :

.