For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हैदराबादच्या वादळात पंजाब गुल

06:57 AM Apr 13, 2025 IST | Tarun Bharat Portal
हैदराबादच्या वादळात पंजाब गुल
Advertisement

अभिषेकचे शतक, हेडचे अर्धशतक, श्रेयसची खेळी वाया

Advertisement

वृत्तसंस्था/ हैदराबाद

हैदराबादच्या वादळी खेळीमध्ये पंजाबची पूर्ण दुर्दशा झाली. आयपीएल स्पर्धेतील शनिवारी येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात दोन्ही संघांकडून जवळपास 490 धावांचा पाऊस पाडला गेला. मात्र अभिषेक शर्माचे तुफानी शतक आणि हेडच्या फटकेबाजीने नोंदविलेल्या अर्धशतकाच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने किंग्ज इलेव्हन पंजाबचा 9 चेंडू बाकी ठेऊन 8 गड्यांनी दणदणीत पराभव केला.

Advertisement

या स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यातही हैदराबादने वादळी खेळी करत राजस्थानचा मोठा पराभव केला होता. त्यानंतर हैदराबाद संघाला पुढील सलग चार सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते. या स्पर्धेतील हैदराबाद संघाचा हा दुसरा विजय आहे.

शनिवारच्या सामन्यात पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली आणि 20 षटकात त्यांनी 6 बाद 245 धावा जमवित हैदराबादला 246 धावांचे कठीण आव्हान दिले. पण ट्रेव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी सलामीच्या गड्यासाठी 74 चेंडूत 171 धावांची भागिदारी केल्याने हैदराबादला हा सामना जिंकणे विशेष कठिण गेले नाही. हैदराबादने 18.3 षटाकात 2 बाद 247 धावा जमवित विजय नोंदविला.

पंजाबच्या डावामध्ये कर्णधार अय्यरने 36 चेंडूत 6 षटकार आणि 6 चौकारांसह 82 तर आर्याने 13 चेंडूत 4 षटकार आणि 2 चौकारांसह 36, प्रभसीमरन सिंग 23 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारांसह 42, वधेराने 22 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 27, स्टोइनिसने 11 चेंडूत 4 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 34 धावा जमविल्या. हैदराबादतर्फे हर्षल पटेलने 42 धावांत 4 तर इशान मालिंगाने 45 धावांत 2 गडी बाद केले. पंजाबच्या डावात एकूण 16 षटकार आणि 18 चौकार नोंदविले गेले.

प्रत्युत्तरादाखल खेळताना हैदराबादच्या डावामध्ये पॉवरप्ले दरम्यानच्या पहिल्या 6 षटकात 83 धावा झोडपल्या गेल्या. हेडने 37 चेंडूत 3 षटकार आणि 9 चौकारांसह 66 तर अभिषेक शर्माने 55 चेंडूत 10 षटकार आणि 14 चौकारांसह 141 धावा झळकाविल्या. क्लासनने 14 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 21 तर इशान किसनने 1 चौकारासह नाबाद 9 धावा केल्या. हैदराबादच्या डावात 14 षटकार आणि 26 चौकार नोंदविले गेले. पंजाबतर्फे अर्शदीप सिंग आणि चहल यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. हैदराबादचे अर्धशतक 21 चेंडूत, शतक 46 चेंडूत, दीडशतक 66 चेंडूत, द्विशतक 90 चेंडूत नोंदविले गेले. हेडने अर्धशतक 2 षटकार आणि 8 चौकारांच्या मदतीने 31 चेंडूत तर शर्माने अर्धशतक केवळ 19 चेंडूत 3 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने झळकाविले. शर्माने शतक 40 चेंडूत 6 षटकार आणि 11 चौकारांच्या मदतीने पूर्ण केले. या सामन्यातील विजयामुळे हैदराबाद संघाने शेवटच्या स्थानावरुन सातव्या स्थानावर उडी मारली आहे. मात्र पंजाबच्या स्थानात बदल झाला नसून हा संघ सहाव्या स्थानावर आहे.

संक्षिप्त धावफलक : पंजाब किंग्ज 20 षटकात 6 बाद 245 (श्रेयस अय्यर 82, प्रभसीमरन सिंग 42, आर्या 36, वधेरा 27, स्टोइनिस नाबाद 34, हर्षल पटेल 4-42, इशान मालिंगा 2-45), सनरायझर्स हैदराबाद 18.3 षटकात 2 बाद 247 (हेड 66, अभिषेक शर्मा 141, क्लासन नाबाद 21, इशान किसन नाबाद 9, अर्शदीप सिंग व चहल प्रत्येकी 1 बळी).

Advertisement
Tags :

.