पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान विवाहबंधनात
अरविंद केजरीवाल यांच्यासह काही निवडक नेत्यांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न
चंदिगढ / वृत्तसंस्था
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान गुरुवारी दुसऱयांदा विवाहबंधनात अडकले. डॉ. गुरप्रीत कौर यांच्यासोबत काही निवडक महनीय व्यक्तींच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला. याप्रसंगी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी वडिलांचे तर राघव चड्डा यांनी भाऊ समजून सर्व विधी पार पाडले. मान आणि गुरप्रीत यांच्या कुटुंबाव्यतिरिक्त केजरीवाल यांच्या कुटुंबीयांसह आम आदमी पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांनी विवाह सोहळय़ाला उपस्थिती लावली होती.
पक्षाच्या अंतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शीख रितीरिवाजांनुसार हा विवाह सोहळा पार पडला. त्यात मान यांची आई आणि बहीण व केजरीवाल आणि त्यांच्या कुटुंबासह काही निवडक पाहुणे उपस्थित होते. मान यांची पत्नी डॉ. गुरप्रीत ही त्यांच्यापेक्षा 16 वर्षांनी लहान आहे. डॉ. गुरप्रीत कौरने 2018 मध्ये हरियाणातील एका खासगी विद्यापीठातून एमबीबीएस पूर्ण केले. तिला दोन मोठय़ा बहिणी असून त्या परदेशात स्थायिक आहेत. सुमारे चार वर्षांपूर्वी दोघांची भेट झाली. भगवंत यांचे हे दुसरे लग्न आहे. 2015 मध्ये त्यांनी पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतला. मान यांना पहिल्या पत्नीपासून दिलशान (17) आणि सीरत (21) ही दोन मुले असून ती आपल्या आईसोबत अमेरिकेत राहतात.
विवाह सोहळय़ावेळी मुख्यमंत्र्यांच्या सेक्टर-2 येथील निवासस्थानी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. या सोहळय़ाला काही निवडक जणांनाच आमंत्रित करण्यात आल्याने सविस्तर माहिती मिळालेली नाही. तथापि, आम आदमी पार्टीचे सहकारी राघव चड्डा यांनी ट्विटरवर काही फोटो शेअर केल्यानंतर दिमाखदार विवाह सोहळय़ाचे दर्शन सर्वांनाच झाले. विवाह सोहळय़ात मान यांनी पिवळय़ा पगडीत ‘कलगी’ आणि सोनेरी रंगाचा कुर्ता-पायजामा परिधान केला होता. तर पत्नी डॉ. गुरप्रीत कौरने लाल रंगाचा पेहराव केला होता. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विवाह सोहळय़ाला प्रत्यक्ष उपस्थित राहण्याबरोबरच ट्विट करून दाम्पत्याचे अभिनंदन केले आहे. ‘भगवंत मान आणि गुरप्रीत भाभी यांना लग्नासाठी शुभेच्छा’ असे त्यांनी म्हटले आहे.