For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वर्दीच्या रिक्षाचालकावर दंडात्मक कारवाई

06:52 AM Jun 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
वर्दीच्या रिक्षाचालकावर दंडात्मक कारवाई
Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

क्षमतेपेक्षा अधिक मुलांना कोंबणाऱ्या वर्दीच्या रिक्षाचालकांवर शनिवारी कारवाई करण्यात आली. 42 रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून सोमवारी पुन्हा कारवाई करण्यात येणार आहे. वाहतूक पोलिसांनी सुरू केलेल्या कारवाईच्या सपाट्यामुळे रिक्षाचालकांत खळबळ माजली आहे.

गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांनी शनिवारी रात्री यासंबंधीची माहिती दिली आहे. शाळकरी मुलांच्या सुरक्षिततेचा विचार करून क्षमतेपेक्षा अधिक मुलांना कोंबणाऱ्या वर्दीच्या रिक्षाचालकांमध्ये जागृतीही करण्यात येत असून सूचना देऊनही जे ऐकत नाहीत, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement

वाहतूक उत्तरचे पोलीस निरीक्षक श्रीशैल गाभी, दक्षिण विभागाचे पोलीस निरीक्षक विनायक बडीगेर व त्यांच्या सहकाऱ्यांनी कॅम्प व इतर परिसरात शनिवारी शिक्षण संस्थांसमोर जाऊन ही कारवाई केली आहे. एखादी वर्दीची रिक्षा शाळेबाहेर पोहोचल्यानंतर पोलिसांकडून रिक्षांमध्ये किती मुले आहेत? याचे व्हिडिओ चित्रीकरण केले जात होते. नियमापेक्षा अधिक मुले आढळून आल्यास त्यांना वाहतूक पोलीस स्थानकात नेऊन कारवाई केली जात होती.

शाळकरी मुलांच्या सुरक्षेची जबाबदारी प्रत्येकाचीच आहे. क्षमतेबाहेर मुले कोंबू नये, शनिवारची कारवाई हा केवळ इशारा आहे. सोमवारपासून परिस्थितीत सुधार झाला नाही तर पुन्हा कारवाई सुरू करण्यात येणार आहे, असे पोलीस उपायुक्तांनी सांगितले. शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्याबरोबरच वर्दीच्या रिक्षातून शाळेला जाणाऱ्या मुलांच्या सुरक्षेचा विचार करून ही कारवाई केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

हाच न्याय शाळेच्या बसना का लागू केला जात नाही?

शाळकरी मुलांसाठी वर्दीच्या रिक्षाचालकांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. हाच न्याय शाळेच्या बसना का लागू केला जात नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. बसमध्येही क्षमतेपेक्षा अधिक मुले कोंबलेली असतात. याबरोबरच फुटपाथ पादचाऱ्यांना मुक्त करण्यासाठी फुटपाथवरील अडथळे हटविण्याचे कामही वाहतूक पोलिसांनी हाती घेतले आहे.

Advertisement
Tags :

.