पुण्यात खळबळ! सारसबागेत बंद कारमध्ये तरुणाचा मृतदेह; घातपाताचा संशय
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित कारचा क्रमांक MH12 SF 5471 असा आहे. मृत तरुणाचे वय अंदाजे 25 ते 30 वर्षे असल्याची शक्यता असून, तो लोणी काळभोर परिसरातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. तसेच तो काळेपडळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बेपत्ता असल्याची माहितीही समोर येत आहे. मात्र, मृताची ओळख अद्याप अधिकृतपणे निश्चित झालेली नाही.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून ही कार नेहरू स्टेडियमसमोरील रस्त्यावर एकाच ठिकाणी उभी होती. बुधवारी सकाळी कारमधून दुर्गंधी येत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. त्यानंतर दादाची वाडी येथील जैन मंदिर परिसरातील एका व्यक्तीने नियंत्रण कक्षाला फोन करून याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. कारचा दरवाजा उघडून पाहणी केली असता आतील सीटवर तरुणाचा मृतदेह आढळला. मृतदेह फुगलेल्या अवस्थेत असल्याने तो काही काळापासून कारमध्ये असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
या घटनेमुळे परिसरात नागरिकांची गर्दी झाली होती. मृतदेहावर मारहाणीच्या खुणा असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, त्यामुळे तरुणाचा घातपात किंवा खून झाला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पोलिसांनी मृतदेह पुढील तपासणी आणि शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला आहे. मृताच्या नातेवाइकांना बोलावण्यात आले असून, त्यांच्याकडून ओळख पटवल्यानंतर मृताचे नाव निश्चित केले जाणार आहे. संबंधित कार येथे कोणी आणि कशासाठी उभी केली होती, तरुणाचा मृत्यू नेमका कधी व कसा झाला, तसेच या घटनेमागे घातपात आहे का, या सर्व बाबींचा तपास पोलीस करत आहेत.
सारसबागसारख्या गजबजलेल्या भागात बंद कारमध्ये तरुणाचा मृतदेह आढळल्याने पुणे शहरात खळबळ उडाली असून, पोलिसांच्या तपासातून या घटनेचे गूढ उकलण्याची शक्यता आहे.
