Pune Rave Party Case: पार्ट्यांच्या राजकारणात खडसे कुटुंबियांना शांत करण्याचा डाव?
गेल्या काही वर्षांमध्ये रेव्ह पार्टी कल्चर मोठ्या प्रमाणात फोफावले आहे
By : प्रशांत चव्हाण
पुणे : गेल्या काही वर्षांमध्ये रेव्ह पार्टी कल्चर मोठ्या प्रमाणात फोफावले आहे. उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये आजही रात्री बेरात्री अशा पार्ट्या रंगतात, हे कुणीही अमान्य करणार नाही. पुण्यातील सिंहगडाच्या पायथ्याशी रंगलेल्या रेव्ह पार्टीच्या स्मृती अजूनही लोकांच्या मनात आहेत.
या पार्टीवर धाड टाकून त्यावेळी मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला होता. अनेक बड्या बापाच्या लाडावलेल्या पोरांचा या पार्टीत सहभाग असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतरही कुठे ना कुठे कशा पार्ट्या होत राहिल्या. त्यातल्या काही पार्ट्यांचा पर्दाफाश झाला, तर काही खपूनही गेल्या असतील. पुण्यातील खराडी परिसरातील परवाची पार्टी मात्र अनेकार्थांनी वेगळी ठरावी.
या पार्टीत इन मिन सातजणांचा सहभाग दिसला. पोलिसांनी धाड टाकली. पण, त्यात आढळलेला साठा तुलनेत नगण्य असल्याकडे लक्ष वेधले जाते. 2.70 ग्रॅम कोकेनसदृश, तर 70 ग्रॅम गांजासदृश अमली पदार्थ, 10 मोबाईल, दोन चारचाकी वाहने, हुक्कापॉट सेट, दारू आणि बियरच्या बाटल्या, हुक्का प्लेवर असा असा एकूण 41 लाख 35 हजार 400 ऊपये किंमतीचा मुद्देमाल यामध्ये जप्त करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.
संशयाचे धुके
एकनाथ खडसे यांचा जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह पाच पुरुष व दोन तरुणींचा यात सहभाग असल्याचेही निष्पन्न झाले आहे. त्याचबरोबर खेवलकर व श्रीपाद हनी ट्रॅप प्रकरणामुळे राज्याचे राजकारण घुसळून निघत असतानाच कथित रेव्ह पार्टीचे प्रकरण पुढे आले आणि त्यामध्ये ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई सापडावेत, हा योगायोग म्हणावा, की राजकीय गेम, असा प्रश्न मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील जनतेला पडला आहे.
हे प्रकरण म्हणजे राजकीय षड्यंत्राचाच भाग असून, टॅप लावून प्रांजल खेवलकर यांना अडकविण्यात आल्याचा आरोप खडसे कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे. तर खडसे यांच्या मोबाईलवर अनेक आक्षेपार्ह फोटोज व व्हिडिओ सापडल्याचा दावा पोलीस करीत आहेत.
किंबहुना, खडसे यांचे जावई प्रांजल यांनी अंमली पदार्थाचे सेवन केले अथवा नाही, याबाबतचा अहवाल अद्याप कसा आला नाही, याचे गौडबंगाल कायम आहे. त्यामुळे याला रेव्ह पार्टी म्हणायचे, की हाऊस पार्टी, याचे उत्तर अद्यापही सापडलेले नाही.
यादव यांच्या प्राथमिक वैद्यकीय तपासणीत त्यांनी मद्य प्राशन केल्याचे देखील आढळून आले आहे. मात्र, 8 ते 10 दिवस उलटल्यानंतरदेखील अंमली पदार्थांबाबतचा अहवाल येत नसेल, तर त्याला काय म्हणायचे? स्वाभाविकच यामुळे शंकाकुशंकांना उधाण आल्याचे दिसून येते.
प्रकरणाला राजकीय अँगल
खरे तर कुणी कितीही हो, नाही म्हटले, तरी या प्रकरणाला एक राजकीय अँगल आहे, हे लक्षात घ्यावे लागेल. राज्याच्या राजकारणात एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील हाडवैर सर्वश्रुत आहे. अलीकडेच एकनाथ खडसे यांनी हनी ट्रप प्रकरणावरून रान उठवत गिरीश महाजन यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या. त्यामुळे संशयाचे धुके निर्माण झाले. एकमेकांशी संबंधाची शक्यता
या प्रकरणात सध्या प्रफुल्ल लोढा अटकेत आहे. त्याच्यावर बलात्कारासह वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लोढा हा गिरीश महाजन यांचा निकटवर्ती असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी खडसे यांनी केली होती. त्यातून महाजन यांची चांगलीच कोंडी झाली. त्यानंतर लोढाचा मुलगा पवन लोढा हा महाजन यांच्या मदतीसाठी पुढे आला.
खडसे आणि मोठ्या साहेबांचेच हे षड्यंत्र असल्याचा आरोप त्याने केला. त्याचबरोबर महाजन हे आमचे दैवत आहेत आणि राहतील, असेदेखील त्याने सांगितले. त्यातून लोढा आणि महाजन कुटुंबीयांत चांगला समन्वय असल्याची बाब पुढे आली. त्याला 2-3 दिवस उलटत नाहीत तोच आता रेव्ह पार्टी प्रकरणात खडसेंचा जावई सापडल्याने हनी ट्रप आणि कथित रेव्ह पार्टी प्रकरणाचा एकमेकांशी संबंध असण्याची शक्यता व्यक्त केली जाते.
राजकीय षड्यंत्र असल्याचा युक्तिवाद
सध्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. प्रांजल खेवलकर यांचे वकील विजयसिंह ठोंबरे यांनी तर संपूर्ण कारवाई राजकीय षड्यंत्र रचून करण्यात आल्याचा युक्तिवाद केला. आरोपींनी कोणत्याही अंमली पदार्थांचे सेवन केले नव्हते.
महिलेच्या पर्समध्ये कोकेन सापडले, त्या महिलेला पाठवण्यात आले होते, याकडे लक्ष वेधतानाच ही कारवाई बनावट असल्याचा आरोपदेखील खेवलकर यांच्या वकिलांनी केला आहे. दुसऱ्या बाजूला पोलिसांनी खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये आक्षेपार्ह फोटो व व्हिडिओ सापडले असल्याचा दावा केला आहे. अर्थात आता अंमली पदार्थाबाबतचा अहवाल काय येतो, याला बरेच महत्त्व असेल.
खडसे कुटुंबीयांना शांत करण्याचा डाव?
एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे याही राजकारणात अॅक्टिव्ह आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे महिला प्रदेशाध्यक्षपद त्यांच्याकडे आहे. महायुती सरकारमधील वादग्रस्त नेते, मंत्र्यांविरोधातील अनेक प्रकरणे त्यांनी लावून धरली आहेत. या पार्श्वभूमीवर खेवलकर यांना अडकवून खडसे कुटुंबीयांना शांत करण्याचा डाव असल्याच्याही चर्चा राजकीय वर्तुळात ऐकायला मिळतात.
सत्ताधाऱ्यांनीही खेवलकरांचे कथित कारनामे पुढे करीत खडसेंची कोंडी करण्याचे प्रयत्न चालवले आहेत. दोन पार्ट्या अर्थात पक्षांचे पार्टीवरून (रेव्ह की हाऊस) सुरू असलेले राजकारण पुढे काय वळण घेते, हेच आता बघायचे.