For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

'सकाळी घरातून निघून गेल्याचा फोन आला, पण घरी पोहोचल्यावर वेगळेच चित्र‘; मुलीच्या जाण्याने कुटुंब हादरले, जाणून घ्या आयटी इंजिनिअर पायल मृत्यू प्रकरणाची इन्साईड स्टोरी

12:05 PM Nov 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
 सकाळी घरातून निघून गेल्याचा फोन आला  पण घरी पोहोचल्यावर वेगळेच चित्र‘  मुलीच्या जाण्याने कुटुंब हादरले  जाणून घ्या आयटी इंजिनिअर पायल मृत्यू प्रकरणाची इन्साईड स्टोरी
Advertisement
पुणे : उच्चशिक्षित, आयटी क्षेत्रात कार्यरत आणि शांत स्वभावाची २९ वर्षीय पायल पवार-झांबरे हिच्या मृत्यूने पुण्यात खळबळ उडाली आहे. सोमवारी (२ नोव्हेंबर) राहत्या घरात पायलचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेनंतर तिच्या माहेरच्या कुटुंबीयांनी सासरच्या मंडळींवर हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचे गंभीर आरोप केले आहेत. पायलचा मृत्यू आत्महत्या नसून घातपात असण्याची शक्यता असल्याचा संशयही नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.

पायल ही पुण्यातील प्रसिद्ध झांबरे पॅलेसशी संबंधित कुटुंबातील सून होती. तिच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर माहेरच्या नातेवाईकांनी सासरच्या मंडळींविरोधात संताप व्यक्त केला. या घटनेनंतर महर्षी नगर परिसरातील झांबरे पॅलेस येथे तोडफोड झाल्याची माहिती समोर आली आहे. परिसरात या घटनेमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले.

Advertisement

सोनं आणि पैशांसाठी छळ केल्याचा आरोप

पायलच्या माहेरच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनुसार, लग्नानंतर सासरच्या मंडळींकडून सोन्याची आणि पैशांची मागणी केली जात होती. प्रत्येक दिवाळीत पाच ते दहा तोळे सोने आणण्याचा आग्रह धरला जात असल्याचा आरोप आहे. पायलचे माहेरचे कुटुंब शेतीवर अवलंबून असून आर्थिक अडचणींमुळे त्यांनी काही काळाची मुदत मागितली होती. मात्र, त्यानंतरही छळ सुरू असल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे.

मुलगी झाल्यानंतरही त्रास दिल्याचा दावा

पायल गर्भवती असताना तिला मुलगाच व्हावा, यासाठी मानसिक दबाव टाकण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. ३० मार्च २०२३ रोजी पायलने मुलीला जन्म दिल्यानंतर सासरच्या मंडळींनी रुग्णालयात वाद घातल्याचे आणि पायल किंवा बाळाची जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिल्याचे तक्रारीत नमूद असल्याची माहिती आहे.

Advertisement

सकाळी फोन आला, पण घरी पोहोचल्यावर वेगळेच चित्र

पुण्यातील मुकुंदनगर परिसरातील अक्षय हाइट्स सोसायटीमधील फ्लॅटमध्ये पायलचा मृतदेह आढळला. सकाळी सातच्या सुमारास सासरच्या मंडळींकडून पायल घरातून निघून गेल्याची माहिती माहेरच्या कुटुंबीयांना देण्यात आल्याचा दावा आहे. मात्र, नातेवाईक घरी पोहोचले तेव्हा पायल मृत अवस्थेत आढळल्याचे सांगण्यात येत आहे. या परिस्थितीमुळे कुटुंबीयांनी संशय व्यक्त केला असून मृत्यूमागील नेमके कारण शोधण्याची मागणी केली आहे.

पती पोलिसांच्या ताब्यात; सासू-सासऱ्यांविरोधातही गुन्हा

या प्रकरणी स्वारगेट पोलिसांनी पायलचा पती अक्षय झांबरे, सासू, सासरे आणि नणंद यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे. पती अक्षय झांबरे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून इतर आरोपींचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.

पायलचा मृत्यू आत्महत्या की अन्य काही कारणामुळे झाला, याबाबत नातेवाईकांनी सखोल आणि निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोपांची सत्यता आणि मृत्यूचे नेमके कारण तपासातूनच स्पष्ट होणार आहे.

Advertisement
Tags :

.