पुणे महापालिकेत दिवाळी गिफ्ट बॉक्स आढळल्याने खळबळ; आयुक्तांच्या आदेशाचे उल्लंघन?
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा गजबजल्या असून विविध राजकीय आणि सामाजिक संघटनांकडून फराळ तसेच दिवाळी किटचे वाटप केले जात आहे. अशातच पुणे महापालिकेच्या आवारात गिफ्ट बॉक्स आणल्याचा प्रकार समोर आला आहे. काँग्रेसच्या व्यापारी सेलचे अध्यक्ष भरत सुराणा हटकल यांनी या व्यक्तीला गिफ्ट बॉक्स कोणाला देण्यासाठी आणले आहेत, अशी विचारणा केली. मात्र, संबंधित व्यक्तीने कोणतीही माहिती न देता एक बॉक्स घेऊन तेथून निघून गेल्याचे व्हिडिओमध्ये दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
महापालिकेच्या तळमजल्यावर गिफ्ट बॉक्स
संबंधित व्यक्ती निघून गेल्यानंतर उर्वरित गिफ्ट बॉक्स महापालिकेच्या तळमजल्यावर ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. महापालिका आयुक्तांनी गिफ्ट स्वीकारण्यास मनाई केली असताना हे बॉक्स महापालिका आवारात आलेच कसे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
विशेष म्हणजे, हे गिफ्ट बॉक्स प्लास्टिकच्या पिशव्यांमधून आणण्यात आल्याचा आरोप आहे. महापालिकेने प्लास्टिक पिशव्यांवरही बंदी घातली असताना या नियमांचे उल्लंघन झाल्याचे सांगण्यात येत आहे. गिफ्ट बॉक्स आणले जात असताना महापालिकेच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी संबंधित व्यक्तीला रोखले नाही, असा आरोपही भरत सुराणा यांनी केला आहे.
यापूर्वीही गिफ्ट बॉक्सचा व्हिडिओ व्हायरल
पुणे महापालिकेच्या आवारात यापूर्वीही गिफ्ट बॉक्स आणल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला होता. त्यावेळी लिफ्टमधून गिफ्ट बॉक्स कार्यालयांमध्ये नेण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. आता पुन्हा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गिफ्ट बॉक्स आणल्याचा प्रकार समोर आल्याने महापालिकेतील नियमांच्या अंमलबजावणीवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
हे गिफ्ट बॉक्स नेमके कोणी आणले, कशासाठी आणले आणि कोणाला देण्यासाठी आणले होते, याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही. त्यामुळे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
