पुणे-लोंढा रेल्वेमार्ग दुहेरीकरणाचे काम पूर्ण
बेळगाव-पुणे रेल्वेप्रवास होणार सुखकर
बेळगाव : मागील अनेक दिवसांपासून रखडलेल्या पुणे-मिरज रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम अखेर पूर्ण झाले. यापूर्वीच मिरज-लोंढा या मार्गाचे दुहेरीकरण, तसेच विद्युतीकरण पूर्ण झाल्याने आता बेळगाव-पुणे हा प्रवास वेगवान करता येणार आहे. दुहेरीकरणाच्या कामामुळे एक्स्प्रेसची गती वाढणार असून प्रवासाचा कालावधी कमी होणार आहे. पुणे-लोंढा या 466 किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गाचे मागील काही वर्षांपासून दुहेरीकरणाचे काम सुरू होते. यापैकी 279 किलोमीटर मार्ग हा पुणे ते मिरज तर उर्वरित 186 किलोमीटरचा मार्ग मिरज ते लोंढा या टप्प्यामध्ये होता. वर्षभरापूर्वी मिरज-लोंढा या रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरण पूर्ण झाले होते.
परंतु, पुणे-मिरज मार्गावरील साताऱ्यानजीक काम अपूर्ण होते. कोरेगाव-रहिमतपूर-तारगाव या अंतिम टप्प्यातील रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम नुकतेच पूर्ण झाले. गुरुवारी या रेल्वेमार्गाची सुरक्षा तपासणी रेल्वेचे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांच्या देखरेखीखाली पूर्ण झाली. यामुळे गुरुवारी पुणे-लोंढा मार्गावरील रेल्वे उशिरा धावत होत्या. पुणे-लोंढा रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणासाठी 4670 कोटी रुपये निधीची तरतूद केली होती. 2015 पासून दुहेरीकरणाचे काम सुरू होते. काही ठिकाणी जमीन हस्तांतरणाचा वाद निर्माण झाल्याने दुहेरीकरणाचे काम रखडले होते. परंतु, रेल्वेमार्गाचे काम पूर्ण झाले असून आता रेल्वेची गती वाढण्याची शक्यता आहे.
बेळगाव-पुणे प्रवास होणार गतीने
मुंबई-बेंगळूर या हायस्पीड रेल्वेची घोषणा काही दिवसांपूर्वीच करण्यात आली होती. या रेल्वेचाही मार्ग मोकळा झाला आहे. त्याचबरोबर बेळगावहून पुण्याच्या दिशेने धावणाऱ्या गोवा एक्स्प्रेस, चालुक्य एक्स्प्रेस, दादर एक्स्प्रेस यासह साप्ताहिक रेल्वेंची गती वाढणार आहे. सुरक्षा आयुक्तांनी या मार्गावरून ताशी 90 किलोमीटर वेगाने रेल्वे चालविण्याची मान्यता दिल्यामुळे भविष्यात आणखी एखादी वंदे भारत धावण्याची शक्यता आहे.