पुणेकरांसाठी मोठी बातमी! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचे 3 नोव्हेंबरला उद्घाटन; पंतप्रधान मोदी ऑनलाइन उपस्थित राहणार
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) माध्यमातून सार्वजनिक-खासगी भागीदारीत उभारण्यात आलेली ही मेट्रो मार्गिका सुमारे 23.3 किलोमीटर लांबीची आहे. हिंजवडीतील आयटी पार्कला पुण्याच्या मध्यवर्ती भागाशी जोडणाऱ्या या मार्गिकेमुळे हिंजवडी, बालेवाडी, बाणेर आणि शिवाजीनगर परिसरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
23 पैकी 17 स्थानके उद्घाटनासाठी सज्ज
या मेट्रो मार्गिकेवरील 23 स्थानकांपैकी 17 स्थानके उद्घाटनासाठी तयार असल्याची माहिती आहे, तर उर्वरित सहा स्थानकांचे काम सुरू आहे. त्यामुळे सुरुवातीला किती स्थानकांवरून प्रवासी सेवा उपलब्ध होणार आणि प्रत्यक्ष सेवा कधी सुरू होणार, याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता आहे.
या मार्गिकेचे उद्घाटन यापूर्वी अनेकदा पुढे ढकलण्यात आले होते. विधानपरिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळेही कार्यक्रम लांबणीवर पडला होता. आता 3 नोव्हेंबरला उद्घाटन करण्याच्या दृष्टीने तयारी सुरू आहे.
बालेवाडी क्रीडा संकुलात कार्यक्रम
उद्घाटनाचा मुख्य कार्यक्रम बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात आयोजित करण्याचे नियोजन आहे. पंतप्रधान मोदींचा प्रस्तावित पुणे दौरा पुढे ढकलण्यात आला असला, तरी ते ऑनलाइन पद्धतीने उद्घाटन करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
या कार्यक्रमात पुण्यातील मेट्रोच्या आणखी दोन टप्प्यांचे भूमिपूजनही करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
हिंजवडी आयटी पार्कमधील कर्मचारी आणि पुण्यातील दैनंदिन प्रवाशांसाठी ही मेट्रो मार्गिका महत्त्वाची ठरणार आहे. मात्र, उद्घाटनानंतर प्रत्यक्ष प्रवासी सेवा कधी सुरू होणार आणि पहिल्या टप्प्यात कोणती स्थानके खुली होणार, याबाबतच्या अधिकृत घोषणेकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.