For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

पुणे पदवीधर निवडणुकीत महायुतीतील अंतर्गत बेबनाव उघड...नेमकं घडलंय काय?

09:47 AM Oct 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
पुणे पदवीधर निवडणुकीत महायुतीतील अंतर्गत बेबनाव उघड   नेमकं घडलंय काय
Advertisement

एकनाथ वाघमोडे

Advertisement

सातारा: राजकारणात एखाद्या निवडणुकीचा निकाल हा केवळ विजय आणि पराभवापुरता मर्यादित नसतो, तर त्यातून भविष्यातील राजकीय समीकरणांची दिशाही ठरत असते. पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या हर्षदा देशमुख यांच्या विजयाने पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणात अशीच नवी चर्चा सुरू झाली आहे. या विजयामुळे माण-खटावच्या राजकीय पटलावर पाच आमदारांचा दबदबा तयार झाला असून, या राजकीय ताकदीचा वापर विकासासाठी होणार की वर्चस्वाच्या लढाईतच तिची विभागणी होणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, महेश शिंदे, मनोज घोरपडे, धैर्यशील कदम आणि हर्षदा देशमुख या पाच आमदारांच्या नावांमुळे माण-खटावच्या राजकीय ताकदीची चर्चा होत आहे. राज्यातील एखाद्या मतदारसंघाला अशा प्रकारे पाच आमदारांचे प्रतिनिधित्व मिळणे ही निश्चितच लक्षवेधी बाब आहे. मात्र, या राजकीय ताकदीचे खरे मोजमाप आमदारांच्या संख्येवर नव्हे, तर त्यांच्या माध्यमातून जनतेच्या प्रश्नांची किती सोडवणूक होते, यावर होणार आहे.

Advertisement

जयकुमार गोरे यांच्या वाढत्या राजकीय प्रभावामुळे महायुतीमथील काही घटक अस्वस्थ असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. भाजपचा विस्तार होत असताना मित्रपक्षांच्या स्थानिक नेतृत्वासमोर आपले राजकीय अस्तित्व आणि प्रभाव टिकविण्याचे आव्हान उभे राहू शकते. त्यातूनच काही ठिकाणी परस्परविरोधी भूमिका घेतल्या जात असल्याचे चित्र निर्माण होते. सोलापूर जिल्ह्यातही स्थानिक राजकीय समीकरणांमुळे भाजपसमोर आव्हान उभे राहिल्याचे चित्र होते. जयकुमार गोरे यांचा प्रभाव आणि त्यांच्या नेतृत्वाभोवती निर्माण झालेली राजकीय ध्रुवीकरणाची परिस्थिती या निवडणुकीच्या विश्लेषणात महत्त्वाची ठरते. एका बाजूला भाजपची संघटनात्मक ताकद, तर दुसऱ्या बाजूला स्थानिक पातळीवरील विरोधी राजकीय घटकांची जुळवाजुळव, अशा परिस्थितीत निवडणूक लढवावी लागल्याचे चित्र दिसले. त्यामुळे हर्षदा देशमुख यांच्या विजयाने शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला बळ मिळाले असले, तरी या निकालातून जयकुमार गोरे यांच्या राजकीय प्रभावाचीही चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. त्यांना विरोध करणारे विविध घटक एकत्र येऊ शकतात, हा या निवडणुकीतून पुढे आलेला राजकीय संकेत मानला जात आहे.

या निकालामुळे भाजपसमोर विशेषतः आणि सातारा जिल्ह्यातील नेतृत्वासमोर आगामी काळात राजकीय समन्वय टिकविण्याचे आव्हान उभे राहिले आहे. मित्रपक्षांमधील मतभेद वेळेत दूर केले नाहीत, तर त्याचे परिणाम केवळ विधानपरिषद किंवा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीपुरते मर्यादित राहणार नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद आणि इतर निवडणुकांमध्येही त्याचे पडसाद उमटू शकतात. पुणे पदवीधर निवडणुकीने पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणात नव्या समीकरणांची चाहूल दिली आहे. हर्षदा देशमुख यांच्या विजयाने शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलेच राजकीय बळ मिळाले, तर जयकुमार गोरे यांच्या राजकीय प्रभावाभोवती निर्माण झालेल्या चर्चेने महायुतीतील अंतर्गत समन्वयाचा मुद्दा ऐरणीवर आणला.

शरद पवार गटाला राजकीय बळ
हर्षदा देशमुख यांच्या विजयामुळे महाविकास आघाडी आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पश्चिम महाराष्ट्रात नव्याने राजकीय आत्मविश्वास मिळू शकतो. मात्र, एका निवडणुकीतील यशाचे रूपांतर कायमस्वरूपी जनाधारात करण्यासाठी संघटनात्मक बांधणी, स्थानिक प्रश्नांवर सातत्याने काम आणि कार्यकर्त्यांमधील समन्वय आवश्यक असतो. त्यामुळे या विजयाचा आगामी निवडणुकांमध्ये किती फायदा होईल, हे पुढील काळातील राजकीय हालचालींवर अवलंबून राहणार आहे.

Advertisement
Tags :

.