पुणे पदवीधरमध्ये भाजपला मोठा धक्का; हर्षदा देशमुख-जाधव विजयाच्या उंबरठ्यावर; अवघ्या 725 मतांची गरज
या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार स्मिता जाधव यांच्याविरोधात हर्षदा देशमुख-जाधव यांनी सुमारे 11,000 मतांची आघाडी घेतल्याने भाजपच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, अंतिम निकालाची अधिकृत घोषणा होणे बाकी असल्याने सर्वांचे लक्ष मतमोजणीच्या अंतिम टप्प्याकडे लागले आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची मानली जात होती. या मतदारसंघात उमेदवारीवरूनही राजकीय समीकरणे चर्चेत होती. मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड या मतदारसंघातून निवडून आले होते. त्यांचे पुत्र शरद लाड यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, भाजपने अखेरीस स्मिता जाधव यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले.
दुसरीकडे, महाविकास आघाडीच्या जागावाटपात पुणे पदवीधर मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वाट्याला आली. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी हर्षदा देशमुख-जाधव यांना उमेदवारी दिली. मतमोजणीत त्यांनी घेतलेली आघाडी भाजपसाठी मोठे आव्हान ठरली आहे.
पुणे पदवीधरमध्ये 62.76% मतदान
पुणे पदवीधर मतदारसंघात एकूण 62.76% मतदानाची नोंद झाली होती. या निवडणुकीत एकूण 2,43,521 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतमोजणीदरम्यान 17,299 मते बाद ठरवण्यात आली, तर विजयासाठी 1,13,113 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता.
सोलापूरमध्ये सर्वाधिक मतदान
जिल्हानिहाय मतदानाच्या आकडेवारीनुसार सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक 71.43% मतदान झाले. सातारा जिल्ह्यात 66.94%, पुणे जिल्ह्यात 61.47%, तर सांगली जिल्ह्यात सर्वात कमी 55.51% मतदान नोंदवण्यात आले.
हर्षदा देशमुख-जाधव यांची आघाडी कायम राहिल्यास पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपला मोठा राजकीय धक्का बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे अंतिम मतमोजणी आणि अधिकृत निकालाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
