पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपचा धक्कादायक ट्विस्ट; तिकीट नाकारल्यानंतरही शरद लाड मैदानात
पुणे : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारीवरून नवा राजकीय ट्विस्ट निर्माण झाला आहे. भाजपने शरद लाड यांच्याऐवजी स्मिता योगेश जाधव यांना अधिकृत उमेदवारी दिल्यानंतरही शरद लाड यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात पोहोचून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. त्यामुळे भाजपच्या गोटात नेमके काय राजकीय गणित सुरू आहे, याबाबत चर्चांना उधाण आले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून शरद लाड पुणे पदवीधर मतदारसंघासाठी जोरदार तयारी करत होते. मतदारसंघात संपर्क वाढविण्यासोबतच त्यांनी निवडणुकीच्या दृष्टीने मोर्चेबांधणी केली होती. त्यामुळे भाजपकडून त्यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात होते. मात्र, उमेदवारांच्या अंतिम यादीत लाड यांचे नाव नसून स्मिता योगेश जाधव यांना संधी देण्यात आली.
भाजपच्या उमेदवारीची घोषणा झाल्यानंतरही लाड यांनी निवडणुकीपासून माघार न घेता अर्ज दाखल करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालय गाठले. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी “मला पक्षानेच अर्ज दाखल करायला सांगितले आहे,” असा दावा केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे भाजपच्या अधिकृत उमेदवारासोबतच लाड यांचा अर्ज नेमक्या कोणत्या भूमिकेतून दाखल होत आहे, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
‘प्लॅन बी’ की वेगळे राजकीय गणित?
भाजपने स्मिता जाधव यांना अधिकृत उमेदवारी दिल्यानंतर शरद लाड यांनी अर्ज दाखल केल्याने हा पक्षाचा संभाव्य ‘प्लॅन बी’ आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. लाड यांनी अर्ज दाखल केल्यानंतर याबाबत सविस्तर भूमिका मांडणार असल्याचे सांगितल्याने राजकीय चर्चांना आणखी हवा मिळाली आहे.
दरम्यान, विधानपरिषदेच्या तीन जागांसाठी भाजपने उमेदवारांची घोषणा केली आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघातून सुधाकर कोहळे, पुणे शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे आणि पुणे पदवीधर मतदारसंघातून स्मिता योगेश जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी इच्छुक उमेदवारांची नावे घेऊन दिल्लीतील पक्षश्रेष्ठींशी चर्चा केल्यानंतर अंतिम निर्णय झाल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर पुणे पदवीधर मतदारसंघासाठी शरद लाड यांच्याऐवजी स्मिता जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
आता शरद लाड यांच्या अर्जामुळे निवडणुकीतील समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यांचा अर्ज पक्षाच्या अधिकृत रणनीतीचा भाग आहे की त्यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे, हे पुढील प्रक्रियेत स्पष्ट होणार आहे. त्यामुळे पुणे पदवीधर मतदारसंघातील भाजपची उमेदवारी आणि शरद लाड यांच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.