खराब हवामानामुळे शनिवारी पुणे - चिपी विमानसेवा रद्द
परूळे । प्रतिनिधी
खराब हवामानामुळे धावपट्टीवर धुके असल्याच्या कारणाने पुणे - चिपी सिंधुदुर्ग विमान सेवा आज शनिवारी रद्द करण्यात आली . कोकणात पर्यटनाचा हंगाम सुरू झाला आहे आणि या पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना विमान सेवा रद्द झाल्याने फटका बसला आहे. गेले तीन महिने मुंबई चिपी सिंधुदुर्ग ही अलायन्सची विमानसेवा बंद आहे . यामुळे मुंबई -सिंधुदुर्ग हवाई प्रवास बंद आहे . अशा परिस्थितीतच नियमित सेवा देणारे फ्लाय ९१ ची पुणे - चिपी सिंधुदुर्ग सेवा खराब हवामानामुळे आज रद्द करण्याची वेळ आली. पुणेहून चिपी सिंधुदुर्ग मध्ये ४५ प्रवाशांना घेऊन विमान निघाले. मात्र , शनिवारी सकाळी धुके असल्याने हे विमान गोवा मोपा विमानतळावर उतण्यात आले व तिकडून प्रवाशांना कारने मोफत सिंधुदुर्गात आणण्यात आले. हवामान खराब असल्याचा अंदाज आल्याने हे विमान गोव्याच्या दिशेने नेण्यात आले. या दरम्यान चिपी ते पुणे प्रवास करण्यासाठी ५ प्रवासी चिपी विमानतळावर दाखल झाले होते. अचानक विमान रद्द झाल्याने प्रवाशांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. विमानतळाच्या परिसरात धुक्याची चादर निर्माण झाल्याने आज विमान माघारी गेल्याची चर्चा सुरू होती.पुणेहून आठवड्यातील शनिवार रविवारी फ्लाय ९१ चे विमान येते. मात्र आज अचानक रद्द झाल्याने प्रवाशांना फटका बसला. सिंधुदुर्गात येणारे विमान आज शनिवारी पुन्हा एकदा खराब हवामानामुळे रद्द करण्यात आले .या विमानतळावर दिवसा येणारी विमाने खराब हवामानामुळे वारंवार रद्द करण्याची नामुष्की येत आहे याकरिता या विमानतळावर नाईट लँडिंग ची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशीही मागणी प्रवाशांकडून होत आहे. विमानतळ सुरू होऊन तीन वर्षे पूर्ण झाली तरी अद्याप सोयी सुविधांपासून हे विमानतळ दुर्लक्षित राहिले आहे फ्लाय 91 ही भारतीय कमी किमतीची प्रादेशिक विमान कंपनीआहे. ज्याचे मुख्यालय,गोवा मोपा येथे आहे .18 मार्च २०२४ पासून सिंधुदुर्ग , बेंगलुरु आणि बेंगलुरु सिंधुदुर्ग हैदराबाद ही सेवा सुरू झाली. मात्र अल्प कालावधीत ही सेवा ही बंद करण्यात आली आणि आता सिंधुदुर्ग पुणे विमान सेवाही रामभरोसे झाली आहे. यामुळे परूळे चिपी सिंधुदुर्ग विमानतळाचे भवितव्य धोक्यात आले आहे.