पुणे बुक फेस्टिव्हल-अवर्णनीय आनंदाचा अनुभव
हजारो पुस्तके, ग्रंथांचं भांडार या निमित्ताने वाचकांच्या भेटीला आलंय. असंख्य लहान मोठ्या प्रकाशकांनी लावलेले पुस्तक विक्रीचे स्टॉल, त्यात व्यवस्थित मांडणी केलेली विविध विषयांवरील पुस्तके पाहताना अवर्णनीय आनंद होतो.
इतिहास मांडणारी, वर्तमानाचा अर्थ लावणारी व भविष्याचा वेध घेणारी असंख्य पुस्तकं! आवर्जून वाचावी, वाचत वाचत, त्यावर चिंतन मनन करत आपल्या एकूणच मानवी अस्तित्वाचा विराट परिघ ओझरता का होईना पण यातून अभ्यासावा, समजून घ्यावा. आपल्यापैकी प्रत्येकाला बालपणी ज्या शिक्षकांनी अक्षर ओळख करून दिली, त्यांच्याबद्दलच्या कृतज्ञतेने हे समोर मांडलेलं अफाट ग्रंथवैभव पाहताना मन भरून येतं.
मनुष्य जन्मापासून मरेपर्यंत त्याच्या आसपासचं जग, समाज, माणसं, निसर्ग, अनंत जीवांचे आश्रयस्थान असलेली समृद्ध सृष्टी हे सारं निरखत असतो. त्याच्या उपजत प्रेरणा व अंगभूत जिज्ञासेने यातलं काही समजून घेत असतो. जे समजलं, ते कुणाला बोलून दाखवतो, कुणासाठी काही लिहून ठेवतो. या स्वाभाविक क्रमाने या जगातील अपरंपार ज्ञानाची असंख्य दालने मनुष्याला खुली झाली आहेत. मानवी वर्तन, त्याची चांगली वाईट प्रवृत्ती, त्यातून आकाराला येणारी संस्कृती व उद्भवणारे संघर्षही, सुसंस्कृत समाजाची जडणघडण व असंस्कृतपणातून झालेला अमर्याद रक्तपात याचे चित्रण अनेकांनी ग्रंथ रुपात शब्दबद्ध केलेलं आहे. ते वाचताना कधी मन रोमांचित होतं, तर कधी संवेदनशील मनाचा अक्षरश: थरकाप उडतो.निसर्ग आणि त्यातले असंख्य जीव, पशू-पक्षी, श्वापदं यांच्याबद्दल अत्यंतिक ममत्व असलेली काही भली माणसं असतात, ती निसर्गावर व या सृष्टीवर भरभरून प्रेम करतात. त्यांनी निसर्गाच्या सान्निध्यात जे पाहिलं, अनुभवलं, त्याचे वर्णन जमेल तेवढं शब्दरूप देऊन ते आपल्या हातात देतात. ते सहज वाचताना आपल्याला कधीच न कळलेलं बरंच काही या सृष्टीच्या पोटात आहे, याची जाणीव होते. मनाच्या कक्षा विस्तारतात, बुद्धीला ते साठवून इतरांना सांगावं असं वाटतं. यातूनच समाजमन संस्कारित होत असतं.
काही लोकांची कल्पनाशक्ती अफाट असते. ते त्यांच्या कल्पनेतील अतर्क्य गोष्टी आपल्यासमोर मांडतात. त्या
पॅंटसी वाचताना या जगाचा व मानवी कल्पनांचा विस्तार किती अमर्याद आहे, या जाणीवेने आपण थक्कच होतो. काही लोक फारसे बहिर्मुख नसतात, पण ते या दृश्य जगात घडणाऱ्या प्रत्येक घटनेमागे जे मानवी कर्तृत्व आहे, त्याची अत्यंत सूक्ष्म चिकित्सा करण्यासाठी मानवी मनात खोलवर बुडी मारून त्याचे अगदी पद्धतशीर निरीक्षण-परीक्षण करतात.
मानवी मनाच्या अवस्थेचा व मनुष्याच्या वर्तनशैलीचा एकमेकांशी असलेला अविच्छेद्य संबंध अभ्यासून ते काही निष्कर्ष मांडतात. त्या निष्कर्षांची पुन: पुन्हा कालसंगती जेव्हा लागत जाते, तेव्हा त्या निष्कर्षांच्या सत्यतेबद्दल संदेह रहात नाही. मग त्या निष्कर्षांचे सर्वकालीन सिद्धांत होतात व त्याचे संकलन गहन गंभीर तत्वज्ञानाचे रूप घेऊन आपल्यासमोर अवतरतात. असे तत्वज्ञ व त्यांचे तत्त्वज्ञान मानवी मनावर सर्वाधिक परिणाम करते. मनुष्य ते वाचून अंतर्मुख व्हायला लागतो. मनुष्याच्या पाशवी असलेल्या उपजत प्रेरणा जर या जगात विध्वंस घडवून मानवी समाजाचे अमर्याद नुकसान करीत असतील, तर तेच मन सकारात्मक पद्धतीने संस्कारित करून मनुष्याला या जगाच्या हिताची कामना व तशीच कल्याणकारी कृती करायला उद्युक्त करणं शक्य आहे, हे समाजाला समजावून सांगण्याचे काम तत्वज्ञ अत्यंत तळमळीने करतात.
सामान्य मनुष्याला आकर्षित करणारे सुखाचे उपभोग आणि ऐश्वर्य याबद्दल तत्वज्ञ निरिच्छ असतात. ते क्षणिक सुख आणि शाश्वत सुख यातलं अंतर समजावून सांगत समाजाला उक्रांतीची एकेक पायरी चढायला मदत करतात. तिही कोणत्याही लाभासाठी नव्हे, तर समाजाप्रती असलेली त्यांच्या मनातील स्वाभाविक करुणा म्हणून! या ग्रंथ प्रदर्शनात वेद उपनिषदे, गीता, रामायण, महाभारत, शंकराचार्य, स्वामी विवेकानंद, अनेक पंथांचे आचार्य, पाश्चात्य तत्वज्ञ, असे खूप मोठे वाङ्मय उपलब्ध आहे.
सध्याचे जीवन जणू कधीच न संपणारी जीवघेणी स्पर्धा आहे, या जाणीवेने या स्पर्धेत कसं टिकायचं, आपल्या शारीरिक, बौद्धिक, मानसिक शक्तीचा विकास कसा करायचा, याचे वस्तुनिष्ठ व्यवहारी आकलन सोपे व्हावे यासाठी अनेकांनी खूप काही लिहिलंय. ते वाचून मनुष्याला समाजात आवश्यक असलेले किमान व्यावहारिक शहाणपण सहज आत्मसात करता येईल. मनुष्याला मन रिझवण्यासाठी करमणूक हवी. आनंदासाठी कलांचा आस्वाद घ्यायला हवा. त्यासाठी त्या त्या विषयाचे किमान आकलन करून घ्यावे लागते. ते समजावून सांगणारी मनुष्याची कला, साहित्य, संस्कृती याबद्दलची धारणा अधिक सकस करणारी ग्रंथसंपदाही खूप उपलब्ध आहे.
मानवी श्रम व दु:ख कमी करण्यासाठी विज्ञान-तंत्रज्ञान अत्यावश्यक आहे. आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाचा परिचय व्हावा, असेही बरेच ग्रंथ इथे पाहता येतात. सामान्य क्षमता असणारी काही माणसं जेव्हा अपार कष्ट व कामातील सातत्य, ध्येय क्षणभरही नजरेआड होणार नाही याची काळजी घेत त्या दिशेने चालत राहतात, तेव्हा ते सगळं जग अक्षरश: विस्मयचकित होईल, असले अतिमानवी वाटावे इतके अफाट कर्तृत्व गाजवून स्वत:ची अमीट मुद्रा काळाच्या कपाळावर उमटवतात.
अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील मौलिक कामगिरी करणाऱ्या, मानवी जीवनाला आकार देण्याचे अपार सामर्थ्य असलेल्या महान व्यक्तींविषयी माहिती देणारी असंख्य जीवनचरित्र आपल्याला पाहता, अभ्यासता येतील असे शेकडो ग्रंथ इथे उपलब्ध आहेत.
आणखी काय आणि किती लिहू?
तुम्ही वाचूनच थकून जाल.
यापेक्षा तुम्ही स्वत:च या ग्रंथ प्रदर्शनाला का भेट देत नाही?
-अभय भंडारी, पुणे