पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर आज स्वाभिमानीचा चक्काजाम
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची माहिती : मागील हप्त्यासह पुढचे किती द्यायचे हे सांगणे अशक्य असल्याची सहकारमंत्र्यांची भूमिका
कोल्हापूर प्रतिनिधी
ऊस दराचा तोडगा काढण्यासाठी बुधवारी सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या उपस्थितीत मुंबई येथे चौथी बैठक पार पडली. या बैठकीत ‘स्वाभिमानी’चे नेते राजू शेट्टी यांच्यासह साखर कारखानदारांचे प्रतिनिधी जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले. या बैठकीत शेट्टी यांनी थोडीशी नरमाईची भूमिका घेत गत हंगामातील 400 रुपयांपैकी 100 रुपयांचा हप्ता त्वरित देण्याची मागणी केली. यावेळी मागील वर्षीचा हिशोब पूर्ण झाला असून आता ती देता येणार नसल्याचे कारखानदारांनी स्पष्ट केले. साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनेच्या परस्पर विरोधी भूमिकेमुळे ही बैठक फिस्कटली. त्यामुळे या बैठकीनंतर राजू शेट्टी यांनी ऊस दराचे आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचे स्पष्ट करून गुरुवारी चक्काजाम आंदोलन करणारच असे जाहीर केले.
या बैठकीतील माहिती देताना शेट्टी म्हणाले, साखर कारखानदार व सरकार ऊस उत्पादक शेतकरी विरोधी भूमिका घेत आहेत. मागील हप्ता देणे शक्य नाही, असे कारखानदारांचे मत आहे. त्यामुळे आंदोलन थांबवून कारखाने सुरू करावेत. मागील हप्ता देता येणार नाही व पुढचे किती द्यायचे हे सांगता येणार नाही अशा पद्धतीची भूमिका जर सहकारमंत्री घेत असतील तर सरकार, कारखानदार व विरोधी पक्ष असे सर्वजण मिळून या कटात सामिल असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे ऊस दराचे आंदोलन अधिक तीव्र करणार असून गुरुवारी राष्ट्रीय महामार्गावर चक्का जाम आंदोलन होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
शासन व कारखानदारांनी व्यावहारीक पातळीवर तोडगा काढावा
यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले, सहकारी कारखाने ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर चालतात. एफ. आर. पी पेक्षा जादा रक्कम देऊ नये असा कोणताही कायदा नाही. शासन व कारखानदार यांनी व्यावहारीक पातळीवर तोडगा काढावा. अडचणीच्या काळामध्ये शेतकऱ्यांनी कारखान्यांना मदत केली आहे. यामुळे साखर कारखान्यांनी एक पाऊल पुढे येत जादा दर दिल्यास सीमा भागातील ऊस शेतकऱ्यांना पुरविण्यासाठी आवाहन करतो. राज्यातील अनेक कारखान्यांचे चेअरमन हे आमदार आणि खासदार आहेत. या लोकांनी धोरणात बदल करण्यासाठी केंद्राकडे काय पाठपुरावा केला? सर्व गोष्टी शेतकऱ्यांनी केल्या तर मग आमदार, खासदार कशासाठी आहेत असा सवाल शेट्टी यांनी उपस्थित केला.
राजू शेट्टींची मागणी कायद्याबाहेरची
या बैठकीत कारखानदारांच्यावतीने भूमिका मांडताना आमदार प्रकाश आवाडे म्हणाले, संघटना एक रकमी एफ. आर. पी. ची भूमिका सोडून मागील हप्ता का मागत आहेत? साखर कारखान्यांनी आर. एस. एफ सूत्रानुसार दर दिला आहे. राजू शेट्टींची मागणी कायद्याच्या बाहेरची असून जादा आलेले पैसे कर्जाला भरलेले आहेत. यामुळे कारखान्यांकडे पैसे शिल्लक नाहीत. गुरूदत्त शुगर्सचे चेअरमन माधवराव घाटगे म्हणाले, केंद्र सरकारचे कायदे चुकीचे आहेत. शेतकरी व कारखानदार यांनी मिळून दिल्लीवर हल्ला करायला पाहिजे. सरकारने साखरेचा किमान विक्री दर 3800 करावा. तसेच इथेनॉलचा भाव 10 रुपयांनी वाढल्यास शेतकऱ्यांना जादा दर देणे शक्य आहे.
या बैठकीस स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील, जनार्दन पाटील, महेश खराडे, संदीप राजोबा, आंदोलन अंकुशचे पुंडलिक पाटील, सहकार सचिव राजेश प्रधान, साखर आयुक्त चंद्रकांत पुलकंडवार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.