For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Pune-Bangalore Highway : शेंद्रे-अतीत रस्त्याची अवस्था बिकट, वाहनचालक संतप्त

12:12 PM May 02, 2025 IST | Snehal Patil
pune bangalore highway   शेंद्रे अतीत रस्त्याची अवस्था बिकट  वाहनचालक संतप्त
Advertisement

राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाचं काम दोन वर्षांपासून रखडलंय

Advertisement

By : इम्तियाज मुजावर

सातारा : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शेंद्रे ते अतीत दरम्यानची अवस्था म्हणजे अक्षरशः वाहनचालकांच्या संयमाची कसोटी! गेल्या दोन वर्षांपासून याच ठिकाणी दररोज दहा ते पंधरा किलोमीटर लांब वाहतूक कोंडीचे शोकांत नाट्य रंगत आहे. अद्याप ना पोलीस प्रशासन जागं झालयं, ना रस्ते विकास महामंडळाला जाग आलीये. उड्डाणपुलांची रखडलेली कामं, खड्ड्यांनी भरलेले रस्ते आणि ढिसाळ पोलीस यंत्रणांमुळे वाहनचालकांना रोजचं अर्धा ते दीड तास शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. कोल्हापूरवरून टोल भरायचा, आणेवाडीत पुन्हा टोल द्यायचा, आणि मध्येच अडकायचं ‘कोंडीच्या खड्ड्यात’ हा नाहक त्रास वाहनचालकांना सहन करावा लागत आहे.

Advertisement

जिल्हाधिकारी गप्प?

साताऱ्यात नव्याने नियुक्त झालेले जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे याकडे अद्यापही लक्ष गेलेले दिसत नाही. जिल्ह्यातील हजारो नागरिक, व्यवसायिक आणि विद्यार्थी दररोज या महामार्गावरून प्रवास करत असताना, 'वाहतूक कोंडी’ ही आता रूटीन बाब झाली आहे. सामान्यांच्या नाडीवर बोट ठेवणं हे प्रशासनाचं कर्तव्य असतं. पण येथे तर 'कर्तव्य विसरलेली यंत्रणा' अशी परिस्थिती आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यावर गप्प का अशी चर्चा सुरु आहे.

भोंगळ नियोजन, रखडलेली कामं आणि नागरिकांची होरपळ

राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाचं काम दोन वर्षांपासून रखडलंय. रस्ते विकास महामंडळाकडून वेळकाढूपणा आणि निष्क्रीय दृष्टीकोन यामुळे विकासाचं चाकच थांबलं असल्याची परिस्थीती आहे. स्थानिक वाहतूक पोलीसही फक्त उभे राहताना दिसतात. नियोजन, पर्यायी रस्ता, नियंत्रण काहीच नाही, अशी दयनीय अवस्था इथे पाहायला मिळत आहे.

‘महाग टोल-खड्डे आणि कोंडीची सोबत’

सर्वसामान्य वाहनचालक टोल भरतोय. पण बदल्यात काय मिळतंय? खड्डे, गोंधळ, कोंडी आणि तासनतासचा वेळ वाया जात आहे. एखाद महत्वाचं काम असेल तर तो व्यक्ती ट्राफिकमध्ये फसतो आहे. महत्त्वाचं म्हणजे यामुळे प्रवास करताना अपघाताचाही धोका वाढला आहे. "हा महामार्ग आता राष्ट्रीय महामार्ग राहिला नसून, नागरिकांच्या संयमाचा 'कसोटी मार्ग' बनलाय," असा संताप सामान्यांमध्ये व्यक्त होतोय. त्यामुळे शेंद्रे ते अतीत महामार्गावरील कोंडीचं भूत उतरवणार कोण? जिल्हा प्रशासन, महामंडळ, की पुन्हा एकदा रस्त्यावर उतरणारे संतप्त नागरिक? अशीही चर्चा सध्या सुरु आहे.

Advertisement
Tags :

.