पुनावाला यांनी ‘धर्मा’मध्ये घेतली 50 टक्के हिस्सेदारी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
प्रसिद्ध उद्योजक अदर पुनावाला यांनी चित्रपट निर्माता करण जोहर यांच्या धर्मा प्रोडक्शन आणि धर्माटिक एंटरटेन्मेंटमध्ये 50 टक्के हिस्सेदारी घेतली असल्याची माहिती मिळते आहे. सदरचा हा खरेदीचा व्यवहार 1 हजार कोटी रुपयांमध्ये झाला असल्याचे समजते.
जोहर यांच्याकडे किती हिस्सेदारी
या व्यवहारानंतर करण जोहर यांच्याकडे 50 टक्के इतकी हिस्सेदारी राहणार आहे. सध्याला करण जोहर यांच्याकडे धर्मामध्ये 90.7 टक्के आणि त्यांच्या मातोश्री हिरु यांच्याकडे 9.24 टक्के हिस्सेदारी आहे. हा व्यवहार झाला असला तरीही करण जोहर हे कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष कायम राहणार आहेत. तसेच अपूर्व मेहता हेदेखील सीईओ म्हणूनच कायम असणार आहेत.
अदर पुनावाला यांच्या गुंतवणुकीमुळे धर्मा प्रोडक्शनला आर्थिकदृष्ट्या बळकटी प्राप्त होणार आहे. भारतात मनोरंजन उद्योग आधुनिक तंत्रज्ञान व निर्मिती प्रक्रियेमुळे अधिक गतीमान झाला आहे.
काय म्हणाले करण जोहर
ही भागीदारी आमच्यासाठी महत्त्वाची आहे. भविष्यकाळात धर्मा प्रोडक्शनला नवे आयाम साध्य करणे शक्य होणार आहे.
काय म्हणाले पुनावाला
प्रोडक्शन हाऊससोबत भागीदारीचा अत्यानंद झाला असून आपल्या मित्राच्या कंपनीशी आपण जोडले जात आहोत याचाही सखेद आनंद झाला असल्याचे अदर पुनावाला प्रतिक्रीया देताना म्हणाले आहेत. येणाऱ्या काळात व्यवसायात नवी उंची गाठण्यासाठी आपले प्रयत्न असतील.