विसर्जन तलावातील पाणी उपशास सुरुवात
त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव
गणेशमूर्तींच्या विसर्जनानंतर शनिवारी सकाळपासून विसर्जन तलावातील पाणी काढण्याच्या कामाला महापालिकेकडून सुरुवात करण्यात आली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात नव्या विसर्जन तलावातील पाणी काढून मूर्ती बाहेर काढल्या जाणार आहेत. यासाठी महानगरपालिकेने एक टीम तयार केली आहे.
अनंत चतुर्दशीला गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यावर्षी सर्वच विसर्जन तलावांमध्ये मूर्तींची संख्या वाढल्याचे दिसून आले. उंच गणेशमूर्तींमुळे विसर्जनाचे मोठे आव्हान प्रशासनासमोर होते. तरीही हे आव्हान पेलत पोलीस प्रशासन व महानगरपालिकेने योग्यरीत्या नियोजन करत गणेशमूर्तींचे विसर्जन पार पाडले.
महानगरपालिकेने व्यवस्था केलेल्या विसर्जन तलावांची स्वच्छता करण्यास आता सुरुवात झाली आहे. कपिलेश्वर येथील नवीन व जुन्या विसर्जन तलावांसोबत जक्कीनहोंड, अनगोळ, मजगाव, वडगाव, जुने बेळगाव, कणबर्गी येथील विसर्जन तलावांची टप्प्याटप्प्याने स्वच्छता केली जाणार आहे.
शनिवारी सकाळपासून नव्या विसर्जन तलावातील पाणी काढण्याच्या कामाला सुरुवात झाली. पाणी पूर्णपणे कमी झाल्यानंतर विसर्जित करण्यात आलेल्या गणेशमूर्ती बाहेर काढल्या जाणार आहेत. यावर्षी मूर्तींची संख्या अधिक असल्यामुळे या कामाला विलंब होण्याची शक्यता आहे.