पल्सर एनएस 400 पुढच्या महिन्यात बाजारात?
किंमत 2 लाख 29 हजारहून अधिक
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपनी बजाज ऑटो पुढील महिन्यामध्ये आपली नवी पल्सर एनएस 400 ही दुचाकी भारतीय बाजारामध्ये उतरवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे ही गाडी सीएनजी इंधनावर चालणारी असेल अशी माहिती कंपनीकडून दिली जात आहे.
बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी एका मुलाखतीत सांगितले की आर्थिक वर्ष 2025 च्या सुरुवातीला कंपनीची सर्वात मोठी पल्सर दुचाकी लाँच केली जाणार आहे. सीएनजीवर आधारित येणारी एनएस 400 पल्सर ही गाडी पुढील महिन्यात म्हणजेच एप्रिलमध्ये किंवा जून महिन्यामध्ये अधिकृतरित्या लॉन्च केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या गाडीला 373.3 सीसीचे लिक्विड कुल्ड इंजिन असणार असून त्यामधून 40 पीएस आणि 35एनएम टॉर्क ऊर्जा निर्माण होणार आहे. सदरची गाडी ही याआधी लॉन्च करण्यात आलेल्या एनएस 200 प्रमाणे दिसायला असणार असल्याची माहिती देखील मिळते आहे. ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी सुविधेसह एलईडी लाइटिंग आणि एलसीडी इन्स्ट्रुमेंट कन्सोल मिळण्याची शक्यता सांगितली जात आहे. गाडीची किंमत 2 लाख 29 हजार रुपये एक्स शोरूम दिल्ली इतकी असू शकते.