For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘ज्ञानवापी’त पूजा सुरूच राहणार!

06:22 AM Apr 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘ज्ञानवापी’त पूजा सुरूच राहणार
Advertisement

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय : मशीद समितीला झटका

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

ज्ञानवापी मशिदीच्या व्यासजी तळघरातील पूजेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून मुस्लीम पक्षाला पुन्हा दणका बसला आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्त्वातील खंडपीठाने सोमवारी दक्षिण तळघरातील पूजा सुरूच ठेवण्याचा निर्णय दिला. अंजुमन व्यवस्था मशीद समितीने दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीशांनी हा निवाडा दिला. ज्ञानवापी तळघराचा प्रवेश दक्षिणेकडून आहे तर मशिदीचा प्रवेश उत्तरेकडून आहे. दोघांचाही एकमेकांवर परिणाम होत नाही. सध्या आपापल्या ठिकाणी पूजा आणि नमाज दोन्ही सुरू असल्यामुळे त्यात बदल करण्याची आवश्यकता नसल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

Advertisement

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात मशीद समितीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सुरुवातीला उच्च न्यायालयाने वाराणसी न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला होता, ज्यामध्ये ज्ञानवापी मशिदीच्या दक्षिणेकडील तळघरात हिंदूंना पूजा करण्याची परवानगी देण्यात आली होती. यासंबंधी आता सर्वोच्च न्यायालयाने काशी विश्वनाथ मंदिर ट्रस्टला नोटीस बजावून उत्तर मागितले आहे.

सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने ज्ञानवापी मशिदीचे व्यवस्थापन करणाऱ्या अंजुमन मशीद समितीच्या विशेष रजा याचिकेवर सुनावणी केली. यावेळी तळघर आणि मशिदीत जाण्यासाठी एकच मार्ग आहे का? अशी विचारणा करण्यात आली. यावर तळघर दक्षिणेला असून मशिदीकडे जाण्याचा मार्ग उत्तरेला असल्याचे मुस्लीम पक्षाचे वकील अहमदी यांनी सांगितले. त्यावर नमाज अदा करण्यासाठी जाण्याचे आणि पूजेला जाण्याचे मार्ग वेगवेगळे असल्यामुळे दोन्ही पद्धतींमध्ये कोणताही अडथळा येणार नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

वाराणसी जिल्हा न्यायालयाने 31 जानेवारी रोजी दिलेल्या आदेशात पुजाऱ्यांना ज्ञानवापीच्या दक्षिणेकडील तळघरात मूर्तींची पूजा करण्याची परवानगी दिली होती. यानंतर 1 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री मशिदीच्या आवारात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नंतर दक्षिणेकडील तळघर भाविकांसाठी खुले करण्यात आले होते.  13 फेब्रुवारी रोजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही ज्ञानवापी संकुलाला भेट देऊन व्यासजींच्या तळघरात पूजा केली होती.

26 फेब्रुवारी रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाने ज्ञानवापी मशिदीच्या दक्षिणेकडील तळघरात पूजा करण्यास परवानगी देण्याच्या जिल्हा न्यायालयाच्या आदेशाविऊद्ध मुस्लीम बाजूने दाखल केलेली याचिका फेटाळली होती. ज्ञानवापी संकुलाच्या धार्मिक स्वरूपावरील परस्परविरोधी दाव्यांशी संबंधित दिवाणी न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यादरम्यान उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रोहित रंजन अग्रवाल यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.

हिंदू बाजूचा दावा

1993 पर्यंत सोमनाथ व्यास यांचे कुटुंब मशिदीच्या तळघरात पूजा करत होते, परंतु तत्कालीन मुलायमसिंह यादव यांच्या नेतृत्वाखालील सरकारने त्यावर बंदी घातली होती, असे हिंदू पक्षाने म्हटले आहे. मुस्लीम पक्षाने या दाव्याला विरोध केला असून मशिदीची इमारत नेहमीच मुस्लिमांच्या ताब्यात असल्याचे म्हटले आहे. तथापि, या जमिनीवर एक प्राचीन मंदिर होते, ज्याचा काही भाग 17 व्या शतकात मुघल सम्राट औरंगजेबच्या काळात नष्ट झाला होता, असा दावा ज्ञानवापी संकुलावरील मुख्य वादात हिंदू पक्षाने केला आहे.

Advertisement
Tags :

.