पुदुच्चेरीची त्रिभाषा सूत्राला मान्यता
वृत्तसंस्था/पुदुच्चेरी
सध्या केंद्र सरकारचे नवे शिक्षण धोरण आणि त्रिभाषा सूत्र या मुद्द्यांवरुन मोठा वाद निर्माण झाला असतानाच, दक्षिण भारतातील केंद्रशासित प्रदेश पुदुच्चेरीने त्रिभाषा सूत्राला मान्यता दिली आहे. या केंद्रशासित प्रदेशाचे गृहमंत्री ए. नम:शिवायम यांनी ही महत्वपूर्ण घोषणा गुरुवारी पुदुच्चेरीच्या विधानसभेत केली. त्रिभाषा सूत्राचे नेमके स्वरुपही त्यांनी स्पष्ट केले. त्रिभाषा सूत्राच्या माध्यमातून केंद्र सरकारने हिंदी भाषेची सक्ती केलेली नाही. विद्यार्थी त्यांची इच्छा असेल तरच हिंदी भाषा तिसरी भाषा म्हणून निवडू शकतात. हिंदी नको असेल, तर त्यांना अन्य कोणतीही प्रादेशिक भाषा या सूत्राच्या अंतर्गत निवडता येते. त्यामुळे त्रिभाषा सूत्राच्या विरोधात काही जणांकडून अपप्रचार होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने कोणत्याही भाषेची सक्ती कोणावरही पेलेली नाही. उलट मातृभाषेतून शिक्षण दिले जाण्यावर सर्वाधिक भर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच दिलेला आहे. त्यामुळे आम्हाला केंद्र सरकारचे नवे शिक्षण धोरण आणि त्रिभाषा सूत्र मान्य असून त्याचे क्रियान्वयन पुदुच्चेरीत केले जाईल. आम्हाला यासंदर्भात कोणताही आक्षेप नाही, असे नम:शिवाय यांनी स्पष्ट केले आहे.