तरुण भारत दिवाळी अंकाचे प्रकाशन
यंदा 75 वा दिवाळी अंक वाचकांच्या हाती देताना आनंद : किरण ठाकुर
बेळगाव : उपलब्ध नोंदीनुसार दैनिक ‘तरुण भारत’ने पहिला दिवाळी अंक 1948 साली प्रसिद्ध केला. त्या हिशेबाने यंदा आपण 75 वा दिवाळी अंक वाचकांच्या हाती देत आहोत, असे उद्गार दै. तरुण भारतचे सल्लागार संपादक आणि समूहप्रमुख किरण ठाकुर यांनी काढले. 2023 च्या दिवाळी अंकाचे प्रकाशन तरुण भारतच्या हिंडलगा कार्यालयात झाले. त्यावेळी ते बोलत होते. संपादक जयवंत मंत्री, व्यवस्थापक गिरीधर रवी शंकर, सीएमओ उदय खाडिलकर, संपादन प्रमुख बालमुकुंद पतकी हे व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी बोलताना किरण ठाकुर यांनी दिवाळी अंकाची मराठी माणसात असलेली क्रेझ, वृत्तपत्रांची आजची परिस्थिती, आणखी तीस-चाळीस वर्षांनी काय चित्र असेल याचे अभ्यासपूर्ण विवेचन केले. संपादक जयवंत मंत्री यांनी दिवाळी अंकांची परंपरा, वाचकांची बदलती आवड यावर भाष्य केले. संपादन प्रमुख बालमुकुंद पतकी यांनी अनेकांच्या सहकार्यामुळेच देखणा, दर्जेदार दिवाळी अंक आम्ही ठरलेल्या वेळीच देऊ शकलो, असा उल्लेख केला. दिवाळी अंकातील साहित्याविषयी बोलताना त्यांनी यंदाच्या अंकात कथा, कविता सोबत मान्यवरांचे लेख असल्याचे सांगितले. अक्षता देशपांडे, गौरी भालचंद्र, सुधीर सुखटणकर, संजीवनी बोकील, अशोक मानकर, अंजली मुतालिक, संध्या राजन, प्रा. अविनाश बापट, सुभाष सुंठणकर, वामन वाशीकर, अपर्णा परांजपे-प्रभू, डी. व्ही. अरवंदेकर आदींसह सोळा कथा अंकात आहेत.
मराठीतील आजचे आघाडीचे गीतकार गुरु ठाकुर, डॉ. श्रीकांत नरुले, डॉ. अनुजा जोशी, माधव सटवाणी, कविता आमोणकर, विनय सौदागर, शिल्पा कुलकर्णी, प्रतिभा सडेकर, वैजनाथ महाजन, सरिता पवार, सुभाष पानसे, हर्षदा सुंठणकर, गीतेश शिंदे, शमिका नाईक, राजकुमार कवठेकर अशा नावाजलेल्या आणि नवोदित कवी-कवयित्रींच्या कविता आहेत. प्रशांत अर्जुनवाडकर यांचे वार्षिक राशिभविष्य यात वाचायला मिळेल. दोन वेगवेगळ्या विषयांवरचे परिसंवाद आहेत. दिवंगत कवी ना. धें. महानोर यांच्यावरचा अमिता देसाई यांचा अभ्यासपूर्ण लेख अंकात समाविष्ट करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची काही परकीय चरित्रे हा सुधीर जोगळेकर यांचा लेख या अंकाचे आकर्षण ठरावे. काशिनाथ जोशी, गुरु खिलारे, विवेक मेहेत्रे आणि रणजित देवकुळे यांची विनोदी व्यंगचित्रे हे एक मुख्य आकर्षण आहे. एकूण अंक उपलब्ध जागेनुसार सर्वांगसुंदर करण्याचा प्रयत्न केला असल्याचे ते म्हणाले. या कार्यक्रमाला विविध विभागप्रमुख तसेच तरुण भारत परिवारातील अनेक सदस्य उपस्थित होते.