नादुरुस्त पूलाची सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पाहणी
स्पीडब्रेकर बसवण्याचीही न्हावेली ग्रामस्थांची मागणी
न्हावेली /वार्ताहर
न्हावेली गावातील नादुरुस्त पुलाची पाहणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता श्री. लोहार यांनी केली. या पाहणीवेळी माजी सरपंच शरद धाऊसकर, ग्रामपंचायत सदस्य तथा शिवसेना (शिंदे गट) प्रतिनिधी सागर धाऊसकर, निलेश परब, सुर्यकांत धाऊसकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.गेल्या काही दिवसांपासून पुलाची दुरवस्था वाढत असल्याने ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता सौ. इंगवले यांना निवेदन सादर केले होते. त्यानुसार कार्यकारी अभियंता यांनी सहाय्यक अभियंता श्री. लोहार यांना प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पाहणी करण्याचे निर्देश दिले होते.दरम्यान, सावंतवाडी - शिरोडा राज्यमार्गावरील न्हावेली गावात वाढत्या वाहनधारकांच्या वेगवान वाहतुकीमुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.त्यामुळे या ठिकाणी तातडीने स्पीडब्रेकर बसवावेत,अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, शाळा व वस्ती परिसरातून वाहने मोठ्या वेगाने जात असल्याने पादचारी व विद्यार्थ्यांना जीविताचा धोका आहे. त्यामुळे पुलाच्या दुरुस्तीबरोबरच स्पीडब्रेकर बसवण्याची मागणी प्रशासनाने गांभीर्याने घ्यावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.