Karad News : बानुगडेवाडीत स्मशानभूमीकडे जाणारा सार्वजनिक रस्ता अतिक्रमणामुळे बंद
कराड येथील मृत व्यक्तींच्या अंतिम संस्कारासाठी नागरिकांना प्रचंड अडचणी
बानुगडेवाडी : बानुगडेवाडी (ता. कराड) येथील स्मशानभूमीकडे जाणारा एकमेव सार्वजनिक रस्ता मोठ्या प्रमाणात अतिक्रमणामुळे पूर्णतः बाधित झाला असून, मृत व्यक्तींच्या अंतिम संस्कारासाठी जाणाऱ्या नागरिकांना प्रचंड हाल सहन करावे लागत आहेत. या रस्त्यावर अतिक्रमण करून थेट उसाचे पीक घेतले गेले असून, त्यामुळे स्मशानभूमीकडे जाण्यासाठी मोकळा मार्गच उरलेला नाही. विशेषतः पावसाळ्यात ही परिस्थिती अधिकच भीषण बनत असून, ग्रामस्थांच्या संतप्त भावना आता उफाळून येत आहेत.
स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता मरणासन्न अवस्थेत आहे. त्यामुळे अंतिम संस्कार साठी जाणाऱ्या नागरिकांची फरफट होत असून प्रशासनाचे मात्र याकडे सोईस्कर दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे ग्रामस्थांनी याबाबत तहसीलदार कार्यालयाकडे अनेक वेळा लेखी निवेदने,तक्रारी देऊनही प्रशासनाने याकडे कानाडोळा केल्याचा गंभीर आरोप होत आहे. मृत्यू हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अटळ सत्य असताना, त्या मृत व्यक्तीच्या अंतिम संस्कारासाठीही योग्य रस्ता उपलब्ध नसेल, ही बाब अत्यंत लाजिरवाणी व माणुसकीला काळीमा फासणारी असल्याची भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
पावसाळ्यात चिखल, पाणी आणि उसाच्या शेतीमुळे रस्ता पूर्णतः बंद होत असून, अनेक वेळा मृतदेह नेणाऱ्या वाहनांना किंवा खांद्यावर मृतदेह घेऊन जाणाऱ्या नातेवाईकांना अक्षरशः शेतातून बाट काढावी लागते. काही वेळा मृतदेह रस्त्यात अडकून राहतो, तर काही वेळा पाय घसरून पडण्याच्या घटना घडत आहेत. अशा अवस्थेत मृतदेहाची विटंबना होत असल्याचे विदारक चित्र बानुगडेवाडीत पाहायला मिळत आहे.
स्मशानभूमी म्हणजे श्रद्धा, शांतता आणि अंतिम विश्रांतीचे ठिकाण असते; मात्र बानुगडेवाडीची स्मशानभूमी आज 'असून खोळंबा नसून बानवा' अशी अवस्था झाली आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून उमटत आहे. प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे अतिक्रमणधारकांचे मनोबल वाढले असून, सार्वजनिक रस्त्यावर उसाचे पीक उभे राहणे ही कायद्याची थट्टाच असल्याचे बोलले जात आहे. ग्रामस्थांनी स्पष्ट शब्दांत मागणी केली आहे की, स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता मोकळा करून अतिक्रमण हटवण्यात यावे, तसेच संबंधितांच्या निष्काळजीपणाची चौकशी करावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा देण्यात आला आहे.