For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नो किं चळवळीतून अमेरिकेत जनतेचा आक्रोश

06:57 AM Apr 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
नो किं चळवळीतून अमेरिकेत जनतेचा आक्रोश
Advertisement

अमेरिकेने इराणवर लादलेले युद्ध काँग्रेसच्या परवानगीने सुरू केले का आधी युद्ध सुरू केले आणि नंतर परवानगी घेतली अशा कितीतरी मुद्यावर बोट ठेवून आंदोलकांनी आम्हाला राजा नको लोकशाही हवी आहे अशा घोषणा देत रस्त्यावर येऊन आक्रोश केला. नुकतेच अमेरिकेत हे आंदोलन झाले ज्यात सर्वाधिक लोकांचा सहभाग दिसून आला.

Advertisement

1776 पासून 2026 पर्यंत आजवर अमेरिकेच्या इतिहासात 80 लाख लोकांचे एवढे मोठे व्यापक जनआंदोलन कधीही घडून आले नव्हते. अत्यंत सुनियोजित अशा आंदोलनाचा प्रसार अमेरिकेच्या सर्व पन्नास घटक राज्यात आणि 3000 पेक्षा अधिक शहरातून झाला. लक्षावधी लोक फलक घेऊन रस्त्यावर आले आणि त्यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एकाधिकारशाही प्रवृत्तींचा निषेध केला. लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांकडून लोकांकरिता चालविलेले कल्याणकारी राज्य होय, अशी लोकशाहीची व्याख्या प्रेसिडेंट अब्राहम लिंकन यांनी केली होती. परंतु वर्तमान अध्यक्ष महोदय ट्रम्प यांनी अमेरिकन लोकशाही परंपरेला काळीमा फासला आहे आणि त्यांनी ‘मन की खुशी दिल का राज’ या न्यायाने मनमानी कारभार चालविला आहे. त्यामुळे अमेरिकेत लक्षावधी लोक रस्त्यावर आले आणि त्यांनी जोरदार निदर्शने केली.

28 मार्च रोजी अमेरिकेने पाहिलेल्या या विशाल जन आंदोलनाचे वैशिष्ट्या असे की कुठे एखादी मुंगीही जखमी झाली नाही आणि कोणाला अटकही झाली नाही. एवढ्या शांततेने एवढ्या शिस्तबद्धपणे आंदोलन करण्याची अमेरिकन लोकशाहीची परंपरा जगातील इतर लोकशाही देशांनी अनुसरली पाहिजे, ही गोष्ट अधोरेखित करण्यासारखी आहे. अनेक समविचारी गटांनी एकत्र येऊन एकाचवेळी सरकार विरोधी भावनांचा एल्गार प्रकट करण्याचे श्रेय या व्यापक जनआंदोलनाकडे जाते. ही चळवळ व्यक्तिश: राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात नाही तर त्यांच्या हुकुमशाही कार्यपद्धतीविरुद्ध आहे हे आंदोलकांनी अधोरेखित केले आहे.

Advertisement

राजा नको आहे आम्हाला लोकशाही हवी आहे असा आक्रोशही आंदोलकांनी नोंदविला आहे तो मोठा अर्थपूर्ण आहे कारण त्यांना असे वाटते की ट्रम्प यांच्या कारकिर्दीत अध्यक्षपद जणू राजेशाहीकडे वाटचाल करत आहे. एवढी मनमानी करणाऱ्या राष्ट्राध्यक्ष विरुद्ध लोकभावना प्रकट करणे ही या आंदोलनाची मध्यवर्ती भूमिका आहे. महोदयांनी सत्तेचा गैरवापर केल्यामुळे अमेरिकेतील लोकशाही संस्था कमकुवत झाल्या आहेत. भक्कम आणि बळकट असलेल्या लोकशाही व्यवस्थांचे खांब त्यांनी दुबळे केले आहेत, हे लक्षात घेऊन जनतेने हा आंदोलनाचा मार्ग पत्करला आहे.

सर्वसमावेशक आंदोलन

उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत पूर्वीपासून पश्चिमेपर्यंत अमेरिकेतील 50 घटक राज्यांना व्यापून टाकणारे हे व्यापक सर्व समावेशक असे जनआंदोलन खरोखरच लक्षणीय ठरले आहे. या आंदोलनाने इतिहासाला कलाटणी दिली आहे. केवळ शहरातच नव्हे तर अगदी ग्रामीण भागात हे आंदोलन सर्वदूर पसरले आहे. केवळ अमेरिकेतच नव्हे तर युरोपातील अनेक देशांमध्ये सुद्धा या आंदोलनाने पकड घेतली आहे. आतापर्यंतचा युरोप अमेरिकेतील मैत्रीचा सुवर्ण धागा ट्रम्प यांनी मोडीत काढला आहे. तुम्हाला तेल हवे असेल तर होर्मुजमध्ये या लढाई करा, नाहीतर अमेरिकेत येऊन तेल खरेदी करा. ट्रम्प यांची ही आडदांड भूमिका युरोपीय देशांना तेथील लोकांना दुखावणारी ठरली आहे. त्यामुळे इराणविरोधी कारवाईत एकाही युरोपीय देशाने स्वेच्छेने आदराने भाग घेतला नाही हे कटू सत्य आहे. आंदोलकांचा तीव्र राग तीन मुद्यांवर आहे. पहिला मुद्दा म्हणजे ट्रम्प तात्यांची एकतर्फी आणि एकांगी तसेच हुकूमशाही प्रवृत्ती होय. नंतर विरोधी कायद्याची आक्रमक अमानवी आणि बेकायदेशीर अंमलबजावणी तसेच इस्रायलच्या दबावामुळे इराणविरोधी युद्धात घेतलेली उडी आणि केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग, यामुळे अमेरिकन लोकशाहीचे वस्त्रहरण झाले आहे. संपूर्ण जगभर अमेरिकेची नाचक्की होत आहे. त्याला जबाबदार कोण असतील तर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे लांगुलचालन करणारे सहकारी आहेत असे आंदोलकांना वाटते.

गेल्या 250 वर्षातील अमेरिकेच्या इतिहासातील हे सर्वात मोठे जनआंदोलन ठरले आहे. अमेरिकेतील 3300 ठिकाणी अंदाजे 80 लाखापेक्षा अधिक लोकांनी या आंदोलनात आपला सहभाग नोंदविला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने पुरोगामी आणि निपक्षपाती संघटनांचा सहभाग दिसून येतो. या आघाडीने समन्वय करताना कुठेही श्रेयासाठी भांडण केलेले नाही हे आंदोलन सर्वांचे आहे, सर्वांनी मिळून केले आहे, या भावनेने त्याची रचना करण्यात आली.

आंदोलनातील तीन टप्पे

या लोकआंदोलनातील तीन टप्पे महत्त्वाचे आहेत. मागे जून आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या दोन टप्प्यात जेवढा प्रतिसाद नव्हता त्यापेक्षा दुप्पट-तिप्पट प्रतिसाद या आंदोलनास का कसा मिळाला याबद्दल थोडासा खल करणे उपयुक्त ठरेल.

युद्धाची झळ प्रत्येक अमेरिकन कुटुंबाला बसत आहे. गॅसचे दर वाढले आहेत. महागाई आभाळाला भेटते आहे शिवाय अकारण इराणमध्ये अमेरिकन फौजा उतरवल्यामुळे हजारो कुटुंबातील माता-पिता आपल्या जवानांच्या भविष्याच्या चिंतेमुळे नाराज झाले आहेत. सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक बदल हे लोकांच्या सहभागावर अवलंबून असतात. लोक जेवढे सक्रिय जेवढे संवेदनशील असतात, तेवढेच जनमत सुद्धा आक्रमक बनते या सत्याची प्रचिती या आंदोलनामुळे आली आहे.

14 जून 2025 च्या जनआंदोलनामध्ये चार ते सहा दशलक्ष लोकांनी सहभाग नोंदविला होता तर 18 ऑक्टोबर 2026 च्या जनआंदोलनात सात दशलक्ष लोक सहभागी झाले होते आणि आता 28 मार्च 2026 च्या लोक आंदोलनामध्ये हा आकडा आठ दशलक्षाच्या पुढे गेला आहे. म्हणजे पुढच्या टप्प्यावर एक कोटी पेक्षा अधिक संख्येने लोक अशा आंदोलनात सहभागी होतील. पहिल्या आंदोलनापेक्षा तिसरे आंदोलनात आंदोलकांची संख्या तिप्पट झाली आहे आणि ट्रम्प यांची लोकप्रियता 30 टक्केपेक्षा अधिक प्रमाणात घसरली आहे, असेही ताज्या जनमत पाहणीवरून लक्षात आले आहे.

आंदोलनात कलावंतांचा सहभाग

अमेरिकेतील या नो किंग्स जन आंदोलनात तेथील कलावंतांनी आपल्या प्रतिभा शक्तीचे दर्शन घडवत या लोक आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदविला आहे.  या आंदोलनात आघाडीवर असलेले प्रमुख कलावंत ब्रुस स्प्रिंगस्टीन, जेन फोंडा, मॅगी रॉजर्स हे होते. शिवाय अभिनेते रॉबर्ट डी निरो यांनी आघाडीवर राहून या आंदोलनात सहभाग घेतला. त्यांनी आंदोलनावर प्रकाश टाकणारे कार्यक्रमसुद्धा सादर केले. शिवाय कलाकारांनी आपल्या कविता, अभिनय संवाद यामुळे चळवळीचे नेतृत्व करताना प्रतिभाषाली अभिव्यक्तीद्वारे चळवळीला नैतिक पाठिंबा दिला.

प्रा.डॉ.वि.ल.धारूरकर

Advertisement
Tags :

.