बालिंगा-दोनवडे पुलाच्या भरावा विरोधात जनआंदोलन
जनहितार्थ सर्वपक्षीयांनी एकत्र येण्याचे आवाहनः राहुल पाटील
कोल्हापूरः (कसबा बीड)
कोल्हापूर ते गगनबावडा या मार्गावरील बालिंगा- दोनवडे दरम्यान होणाऱ्या पुलाच्या भराव कामामुळे या परिसरातील सुमारे २० ते २५ गावांना महापुराचा फटका बसणार आहे. यामध्ये कांसह जिवीतहानी होण्याचा धोका होऊ शकतो. त्यामुळे या ठिकाणी भरावा ऐवजी कमानीद्वारे पूल उभारावा, यासाठी जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांनी दिला. निवृत्ती संघात बुधवारी (दि. १२) झालेल्या बैठकीत या कामात कोणतेही राजकारण न करता जनहितासाठी सर्वपक्षीयांनी एकत्र येण्याचे आवाहनही त्यांनी केले.
निवृत्ती सहकारी संघात बुधवारी (दि.१२) रोजी परिसरातील काही कार्यकर्त्यांच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पाटील म्हणाले, की या फुलाचा भराव २० ते २१ फूट उंचीने करण्यात येणार आहे. त्यामुळे चाळीस ते पन्नास गावांना महापुराचा फटका बसणार आहे हे टाळण्यासाठी, या ठिकाणी भराव न टाकता कमानीद्वारे पुलाचे काम झाले पाहिजे. येत्या शनिवारी (दि १५) पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत एक बैठक होत आहे. या बैठकीमध्ये लोकांच्या भावना लक्षात घेऊन भरावाचे काम रद्द करून पावसाळ्यापूर्वी कमानी द्वारे पूल उभारला पाहिजे. अन्यथा पुलाचे काम होऊ देणार नाही. निर्णय न झाल्यास पावसाळ्यापूर्वी येथील भराव काढून टाका. अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
बैठकीत गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे म्हणाले की, यापूर्वी आलेल्या पुराचा अनुभव लक्षात घेता, बालिंगा ते दोनवडे दरम्यान होणाऱ्या पुलाचा भराव २१ फुटाच्या वरती असणार आहे, त्यामुळे अनेक गावे पुरात जाणार आहेत. हे प्रशासनाने लक्षात घ्यावे. कमानीद्वारे पूल उभारला नाही, तर काम होऊ देणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.
शेकापचे बाबासाहेब देवकर यांनी, बालिंगा- दोनवडे दरम्यानचा पूल हा पिकांसह जीवितहानीलाही धोकादायक आहे. या भरावाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यासाठी आम्ही एक पाऊल पुढे आहोत. या परिसरातील गावागावात जाऊन जनजागृती करूया आणि प्रशासनाच्या विरोधात लढा उभारूया. असे सांगितले.
भोगावतीचे चेअरमन शिवाजीराव पाटील, पैलवान अशोक माने (वाकरे), संतोष पोर्लेकर (आरे), प्रा. युवराज पाटील (कळे), बुद्धिराज पाटील (महे), प्रकाश पाटील (कोगे), विलास पाटील (कळे), सरदार पाटील (दोनवडे) यांनी तीव्र शब्दात ठरावाच्या विरोधात संताप व्यक्त केला. बाळासाहेब मोळे यांनी आभार मानले.
यावेळी जी डी पाटील, दिगंबर मेडशिंगे, राजू अडके, सज्जन पाटील, कृष्णात पाटील, सुभाष पाटील, शिवाजी पाटील, आनंदा दिंडे, दत्ता मुळीक, अमर कांबळे, बाबासाहेब चव्हाण आदी उपस्थित होते.
शनिवारनंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरणार
कोल्हापूर ते गगनबावडा या मार्गावरील बालिंगा- दोनवडे दरम्यान होणाऱ्या पुलाच्या भरावाच्या विरोधातील आंदोलनाची पुढील दिशा शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात होणाऱ्या बैठकीनंतर ठरविण्यात येणार आहे. यासाठी रविवारी किंवा सोमवारी बैठक घेण्याचे ही या बैठकीत ठरले