महाराष्ट्रात आज सिद्धरामय्या यांची जाहीर सभा
कन्नड भाषिक मतांवर डोळा, नांदेडला करणार मुक्काम
बेळगाव : कर्नाटकातील शिग्गाव, चन्नपटणा,संडूर पोटनिवडणुकीसाठी झालेल्या मतदानानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे निवडणूक प्रचारासाठी शुक्रवारी महाराष्ट्र दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांचा दौरा जाहीर झाला असून विशेष विमानाने ते शिर्डीला जाणार आहेत. शुक्रवार दि. 15 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजता बेंगळूर येथील एचएएल विमानतळावरून विशेष विमानाने ते शिर्डीला रवाना होणार आहेत. सकाळी 10.30 वाजता शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावर ते दाखल होणार आहेत. त्यानंतर हेलिकॉप्टरने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळाला भेट देण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील चोंडी (ता. जामखेड) येथे जाणार आहेत.
चोंडीहून हेलिकॉप्टरने जत तालुक्यातील संख येथे निवडणूक प्रचारासाठी सिद्धरामय्या पोहोचणार आहेत. दुपारी 12.50 वाजता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्यावतीने संख येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत ते भाग घेणार असून जत तालुक्यातील कानडी भाषिकांची मते काँग्रेसला मिळावीत यासाठी त्यांचा हा दौरा आहे. त्यानंतर नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथे होणाऱ्या जाहीर सभेत दुपारी 3.30 वाजता सिद्धरामय्या भाग घेणार आहेत. नांदेड येथे त्यांचा मुक्काम आहे. शनिवारीही ते महाराष्ट्रात निवडणूक प्रचार करणार असल्याची माहिती मिळाली असून कानडी भाषिकांच्या मतांसाठी कर्नाटकातील नेत्यांची प्रचारसभा सुरू आहे.