सार्वजनिक वाचनालयातर्फे मराठी भाषा गौरव-महिला दिन
बेळगाव : सार्वजनिक वाचनालयातर्फे मराठी भाषा गौरव दिन आणि जागतिक महिला दिन असा संयुक्त कार्यक्रम रविवारी साजरा करण्यात आला. वाचनालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या मराठी विभागप्रमुख डॉ. मनीषा नेसरकर उपस्थित होत्या. व्यासपीठावर वाचनालयाचे अध्यक्ष अनंत लाड, उपाध्यक्ष प्रा. विनोद गायकवाड आणि सहकार्यवाह अनंत जांगळे उपस्थित होते. यावेळी मराठी विभागातील पीएचडी पूर्ण केलेल्या आणि करीत असलेल्या विद्यार्थिनींनी आपले अनुभव कथन केले. स्त्रियांचे सामर्थ्य आणि सृजनशिलता आमच्या विद्यार्थिनींनी सिद्ध केली, असे डॉ. मनीषा नेसरकर म्हणाल्या. पीएचडी पदवीपर्यंतचा प्रवास खडतर असतो. पण सर्व संकटांना तोंड देत यशाचे शिखर गाठणाऱ्या या मुली इतरांना आदर्शवत आहेत. त्यामुळे सार्वजनिक वाचनालयाचा हा उपक्रम प्रेरणादायी आहे, असे त्या म्हणाल्या. सर्व विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक व स्वागत अध्यक्ष अनंत लाड यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. विनोद गायकवाड तर आभार रघुनाथ बांडगी यांनी मानले.