हनिट्रॅप प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका
आज सुनावणी होणार : राजकीय वर्तुळात कुतूहल
प्रतिनिधी/ बेंगळूर
कर्नाटकाच्या राजकारणात वादळ निर्माण करणाऱ्या हनिट्रॅप प्रकरणाची योग्य आणि नि:पक्ष चौकशी व्हावी, यासाठी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. सदर याचिकेवर आज मंगळवारी सुनावणी होण्याची दाट शक्यता आहे. जर न्यायालयाने सीबीआय किंवा इतर कोणत्याही स्वतंत्र एजन्सीमार्फत तपासाचे आदेश दिले तर या प्रकरणातील आरोपींना कायदेशीर अडचणींना सामोरे जावे लागेल.
जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या नेतृत्त्वाखालील पीठासमोर विनयकुमार सिंह यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी होणार आहे. मागील आठवड्यात सहकार मंत्री के. एन. राजण्णा यांनी विधानसभेत हनिट्रॅप प्रकरणाचा गौप्यस्फोट केला होता. 48 जणांना यात अडकविण्यात आले असून त्यात न्यायाधीशांचाही समावेश असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यामुळे या प्रकरणाची नि:पक्ष चौकशी करून सत्य समोर आणावे, अशी विनंती याचिकाकर्त्याने केली आहे.
याचिकाकर्त्याने दाखल केलेला अर्ज सूचीबद्ध करण्यात आला असून त्यावर तातडीने सुनावणी हाती घेणार असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणाविषयी राजकीय वर्तुळात कुतूहल वाढले आहे.