छठ पूजेनिमित्त दिल्लीत सार्वजनिक सुटी जाहीर
राज्यपालांच्या प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांचे शिक्कामोर्तब
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीत 7 नोव्हेंबर रोजी छठपूजेसाठी सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. दिल्लीचे उपराज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी मुख्यमंत्री आतिशी यांना पत्र लिहून 7 नोव्हेंबर रोजी छठ सणाच्या संध्याकाळच्या अर्घ्याचा दिवस सार्वजनिक सुटी म्हणून घोषित करण्याची विनंती केली होती. या प्रस्तावाला मुख्यमंत्री आतिशी यांनी मंजुरी दिली आहे. यापूर्वी दिल्ली सरकारच्या प्रतिबंधित सुट्ट्यांच्या यादीत छठपूजेचा समावेश होता. चार दिवस चालणारा छठ उत्सव 5 नोव्हेंबरला सुरू होणार असून 8 नोव्हेंबर रोजी सूर्याला अर्घ्य दिल्यानंतर सांगता होईल. यादरम्यान भाविकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी दिल्लीतील छठ घाटांवर विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे. पूर्वांचल आणि बिहारमधील लोकांसाठी छठ पूजेला विशेष महत्त्व असल्याने सर्वच राजकीय पक्षांच्या नजरा त्याकडे लागल्या आहेत.