दर्शनासह आकर्षक गणेशमूर्ती पाहण्यासाठी नागरिक रस्त्यावर
छत्रपती शिवाजी महाराज चौकातील महागणपतीच्या दर्शनासाठी झालेली गर्दी
कोल्हापूर प्रतिनिधी
शनिवार पासून गणेशोत्सवाला धामधुमीत सुरुवात झाली आहे. यामुळे सद्या सर्वत्र चैतन्यदायी वातावरण आहे. सार्वजनिक गणेश मंडळांसह घरोघरी श्री गणेश आरतीचा सूर कानी येत आहे. तर मंगळवारपासून काही नागरिक गणेशदर्शनासाठी आणि आकर्षक मूर्ती, सजावट पाहण्यासाठी बाहेर पडू लागले आहेत.
मांगल्याचा आणि आनंदाचा गणेशोत्सव सुरु असून अनंत चतुर्थीपर्यंत उत्सव सुरु राहणार आहे. सार्वजनिक गणेशमंडळाच्या मूर्ती विराजमान झाल्यानंतर आता मंडळांच्या कार्यकर्त्यांची देखाव्याची तयारी सुरु आहे. काही मंडळांकडून आकर्षक गणेशमूर्ती, मोठी सजावट, मंदिरांच्या प्रतिकृती साकरण्यात आल्या आहेत. तसेच विद्युत रोषणाईही आकर्षण ठरत आहे.देखावे पाहण्यासाठी घरगुती गणपती विसर्जनानंतर गर्दी होण्याची शक्यता आहे. तरीही मंगळवारी रात्री शहरातील मोठया गणेशमूर्तींचे दर्शन घेण्यासाठी नागरिक बाहेर पडल्याचे दिसून येत होते. विशेषत: छत्रपती शिवाजी महाराज चौकातील महागणपतीच्या दर्शनासाठी गर्दी होत आहे. तसेच शहरातील अन्य आकर्षक गणेशमूर्ती पाहण्यासाठीही भाविक येत आहेत.