सार्वजनिक गणेश मंडळांकडून मंडप उभारणी सुरू
कोल्हापूर :
गणेश आगमन 27 ऑगस्टला होणार आहे. या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांच्या कामांनी वेग आला आहे. यंदाच्या गणेश मंडळाच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजीनदारासह अन्य सदस्यांची निवडीचे काम सुरू आहे. संबंधीत मंडळाचे पदाधिकारी व सदस्यांनी गणेशमूर्तीचे बुकींग केले आहे. बहुतांश मंडळांनी परवानगी घेवून मंडप उभारणीस सुरुवात केली.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यासाठी गणेश मंडळे सज्ज झाली आहेत. राजारामपुरी, शाहुपुरी, लक्ष्मीपुरी, मंगळवार पेठ, शिवाजी पेठ, बुधवारपेठ आदी भागातील गणेश मंडळे इतरांपेक्षा अनोख्या पध्दतीने गणेशोत्सव साजरा करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्या पध्दतीने मंडप उभारणी सुरू केली आहे. मंडपासह भला मोठा स्टेजही उभारला जाणार आहे. पावसापासून गणेशमूर्तीसह डेकोरेशनच्या सुरक्षेसाठी पत्र्याचा मंडम उभारण्याला प्राधान्य दिले आहे. मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. रस्त्यांवर मंडप उभारताना रस्त्यावरील वाहनांना व पादचाऱ्यांना अडथळा होणार नाही, अशा पद्धतीने मंडप उभारण्याचे नियोजन केले आहे. तसेच महापालिकेने सार्वजनिक गणेश मंडळांना परवानगी देण्यासाठी उभारलेल्या स्वतंत्र कक्ष एक खिडकी योजनेतून परवानगी घेण्यास प्रारंभ झाला आहे. महापालिका, शहर वाहतूक पोलिसांचे नाहरकत पत्र व धर्मादाय आयुक्तांकडे संस्था नोंदणी करण्याचं काम युध्द पातळीवर सुरू आहे.
सार्वजनिक गणेश मंडळाचे कार्यकर्ते दिवसभर आपल्या उदरनिर्वासाठी कामधंदा करून पुन्हा रात्री मंडप उभारणीला वेळ देतात. मंडळाच्या प्रत्येक सदस्याला कामाची विभागणी करून दिली जात आहे. त्यानुसार मंडप उभारणीचे काम सुरू केले जात आहे. सजीव व तांत्रिक देखाव्याच्या सोयीनुसार मंडप तयार केला जाणार आहे. मोठ्या मंडळाच्या गणेशमूर्तीच्या दर्शनासाठी लाखो भाविक गर्दी करतात. त्यामुळे मंडपासह दर्शनलाईनही तयार केली जाणार आहे. एकूणच सार्वजनिक गणेशोत्सवाच्या तयारीला वेग आला आहे.
गणेश मंडळांनी पावती पुस्तकाचे पूजन करून वर्गणी घेण्यास प्रारंभ केला आहे. प्रत्येक मंडळाची वर्गणीची रक्कम वेगवेगळी आहे. काही भाविक श्रध्देने वर्गणी म्हणून मोठी रक्कम देतात. तर काहींनी महाप्रसादाची जबाबदारी उचलली आहे.