इराणमध्ये जनतेच्या असंतोषचा भडका
प्रक्षुब्ध आंदोलकांकडून जाळपोळ, हजारो रस्त्यांवर
वृत्तसंस्था / तेहरान (इराण)
इराणमध्ये सरकारविरोधातील आंदोलन आता चांगलेच भडकले आहे. या देशाच्या विविध भागांमध्ये हजारो आंदोलक रस्त्यांवर उतरले असून त्यांनी अनेक सरकारी इमारतींना आगी लावण्याचे सत्र चालविले आहे. इराणच्या धार्मिक प्रशासनाने देशभरातली इंटरनेट सेवा बंद केली असून आंदोलकांवर अनेक स्थानी गोळीबार झाल्याचे वृत्त आहे. अनेक आंदोलकांचा या कारवाईत मृत्यू झाल्या असण्याची शंका व्यक्त केली जात आहे. तथापि, अधिकृत दुजोरा प्राप्त झालेला नाही. आंदोलकांवर अत्याचार झाल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा स्पष्ट इशारा अमेरिकेने इराणच्या प्रशासनाला दिला असून तणाव वाढला आहे. या आंदोलनात 50 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचे समजते.
आंदोलकांच्या जाळपोळीत इस्फाहान येथील ‘इस्लामीक रिपब्लिक ऑफ इराण ब्रॉडकास्टिंग सेंटर’ची इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहे. बंदर अब्बास या महत्याच्या बंदराकडे जाणारे सर्व रस्ते आंदोलकांनी आडवून धरले आहेत. दक्षिण इराणमधील हे बंदर इराणच्या व्यापाराच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे मानले जाते.
इराण प्रशासनाची कारवाई
इराणच्या प्रशासनाने आंदोलकांवर कठोर करवाई करण्याचा इशारा दिला असून अनेक स्थानी त्यांच्यावर सुरक्षा सैनिकांनी गोळीबार केल्याचे वृत्त आहे. या गोळीबारात अनेकांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली असली, तरी या माहितीला अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. देशातील सर्व शहरांमध्ये इंटरनेट बंद करण्यात आले आहे. जवळपास 90 टक्के इराणमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संपूर्ण इराणमध्ये सुरक्षा व्यवस्था कडेकोट करण्यात आली असली, तरीही आंदोलन मोठ्या वेगाने पसरत चालल्याने प्रशासन चिंताग्रस्त झाले असून प्रशासकीय अधिकारी सत्ताधीशांकडून सूचनांची प्रतीक्षा करीत आहेत.
10 दिवस सलग आंदोलन
या आंदोलनाचा प्रारंभ 28 डिसेंबरला झाला आहे. तेव्हापासून ते सातत्याने या देशाच्या नव्या नव्या भागांमध्ये पसरत आहे. आता ग्रामीण भागातही या आंदोलनाचे पडसाद उमटू लागले आहेत. वाढती महागाई, प्रचंड बेरोजगारी, आर्थिक कुव्यवस्थापन आणि धार्मिक प्रशासनाचे दुर्लक्ष यांच्याविरोधात हे आंदोलन आहे, असे आंदोलनकर्त्या संघटना आणि युवक संघटनांनी स्पष्ट केले आहे.
राजकीय आंदोलनात रुपांतर
आर्थिक कारणांसाठी प्रारंभ झालेले हे आंदोलन आता राजकीय आंदोलनात परिवर्तीत झाले आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. इराणच्या धर्मांध प्रशासनाला तेथील जनता वैतागली असून तिला आता हे प्रशासन नको आहे. शुक्रवारी सकाळपासून या देशाच्या 100 हून अधिक शहरांमध्ये आंदोलन पसरले असल्याने सुरक्षा व्यवस्थेवर मोठा ताण पडत आहे. सध्याच्या प्रशासनाला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, अशा अर्थाच्या घोषणा आंदोलकांकडून दिल्या जात आहेत. या आंदोलनाचे आंतरराष्ट्रीय पडसादही आता वेगाने उमटत आहेत.
हजारो लोकांना अटक
इराणच्या पोलिसांनी आणि अर्धसैनिक दलांनी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न चालविला आहे. 10 हजारांहून अधिक लोकांना अटक करण्यात आली असून लाठीमार, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडणे या बाबी गेल्या 10 दिवसांमध्ये नित्याच्याच झाल्या आहेत. अनेक स्थानी गोळीबार होऊननही आंदोलन थांबविणे प्रशासनाला अशक्य झाल्याची वृत्त प्रसारित होत आहेत. लहान मुलांनाही अटक करुन कारागृहात डांबण्यात येत आहे, अशी माहिती स्थानिक पत्रकारांनी दिली. कठोर वृत्त निर्बंधांमुळे नेमके काय घडत आहे, यासंबंधीची खरी महिती बाहेर पडणे कठीण झाल्याने अफवांनाही ऊत आला असून त्यामुळे जनतेच्या असंतोषात अधिकच भर पडत आहे. बहुतेक हे आंदोलन सध्याच्या शासनाचा बळी घेऊनच थांबेल, अशी शक्यता विदेशी पत्रकार आणि अभ्यासक व्यक्त करीत आहेत.
अमेरिकेचा प्रवेश
इराणमधील या वादात अमेरिकेनेही उडी घेतली असून आंदोलकांना मारण्यात आल्यास इराणच्या प्रशासनाला मोठी किंमत मोजावी लागेल, असा थेट इशारा अमोरिकेने दिला आहे. अमेरिकेच्या आखातातील युद्धनौका सज्ज आहेत. इराणवर आम्ही केव्हाही कारवाई करु शकतो, असा संदेश अमेरिकेने स्पष्टपणे दिला आहे. त्यामुळे अमेरिका-इराण युद्ध होणार काय, असा प्रश्न विचारला जात आहे.
अराजकसदृश स्थिती
ड इराणच्या प्रशासनाविरोधात लहान मुलांचेही रस्त्यांवर उतरुन आंदोलन
ड हजारो लोकांची धरपकड, 100 हून अधिक शहरांमधील व्यवहार ठप्प
ड देशात इंटरनेटरवर बंदी, गोळीबारात अनेकांचा मृत्यू झाल्याची माहिती
ड आंदोलकांवर अत्याचार केल्यास अमेरिका इराणला धडा शिकविणार