For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जाहीर प्रचाराच्या तोफा थंडावल्या

11:24 AM May 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
जाहीर प्रचाराच्या तोफा थंडावल्या
Advertisement

जिल्ह्यात जमावबंदीचा आदेश : जिल्हा निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांची माहिती

Advertisement

बेळगाव : जिल्ह्यातील बेळगाव व चिकोडी लोकसभा मतदारसंघासाठी दि. 7 मे रोजी मतदान होणार असून राजकीय पक्षांच्या जाहीर सभांची रविवारी सायंकाळी 5 वाजता सांगता करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी 48 तासांसाठी जिल्ह्यात जमावबंदी 144 कलम जारी करण्यात आला आहे. ध्वनीवर्धक वापरण्यास निर्बंध घालण्यात आले असून इतर मतदारसंघातून आलेल्या राजकीय नेत्यांना, कार्यकर्त्यांना मतदारसंघ सोडण्याचे आदेश जारी करण्यात आले असून 48 तासांसाठी मद्य विक्रीस निर्बंध घालण्यात आले आहेत, असे जिल्हा निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही माहिती दिली. दि. 7 मे रोजी मतदान होणार असल्याने निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार नियम जारी करण्यात आले आहेत. जिल्ह्यात बेळगाव, चिकोडी या दोन लोकसभा मतदारसंघासह कारवार लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या खानापूर व कित्तूर तालुक्यात उपरोक्त आदेशाचे पालन केले जाणार आहे. सदर मतदारसंघामध्ये 41 लाख 5 हजार 225 मतदार आहेत. जिल्ह्यामध्ये 1 लाख 24 हजार 419 युवा मतदार आहेत. यामध्ये 68 हजार 181 महिला तर 56 हजार 218 पुरुष मतदार आहेत. 85 वर्षांवरील 45,023 मतदार असून घरोघरी जाऊन त्यांचे मतदान घेण्यात आले आहे. 4 हजार 524 मतदान केंद्रे आहेत. चिकोडी लोकसभा मतदारसंघातून 17 पुरुष व एक महिला उमेदवार आहे. बेळगाव मतदारसंघात 13 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली.

राजकीय पक्षांना सोय

Advertisement

मतदान दिनी मतदान केंद्रापासून 200 मी. अंतरावर राजकीय पक्षांना बुथ निर्माण करण्यास सोय आहे. टेबल व खूर्ची घालून राजकीय पक्ष आपल्या पक्षाचा 4×8 चा बॅनर लावण्यास मुभा आहे. यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांना माहिती देणे गरजेचे आहे. मतदारसंघामध्ये राजकीय पक्षांकडून खुलेआम मतदारांना पैसे वाटप केले जात आहेत. याबाबत राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून माहिती देऊन ठोस कारवाई केली जात नाही, असा आरोप राजकीय पक्षांकडून करण्यात येत आहे. याबाबत पत्रकारांनी विचारले असता अधिकृत तक्रार आली नसल्याने कारवाई केली गेली नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. तर अनेक ठिकाणी राजकीय पक्षांच्या सूचनेनुसार कारवाई करण्यात आली आहे. मात्र त्याठिकाणी काही सापडले नसल्याचेही जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले. यावेळी पोलीस आयुक्त एडा मार्टीन, यांनी शहापूर येथील कारवाईबाबत स्पष्टीकरण दिले. राजकीय पक्षांकडून आरोप करण्यात येत असले तरी रात्री उशिरापर्यंत ठोस तक्रार देण्यात आली नसल्याने तक्रार नोंदवून घेण्यात आली नसल्याचे सांगितले. राजकीय पक्षांकडून आरोप-प्रत्यारोप करण्यात येत असले तरी कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई केली जात आहे. पैसे वाटण्याचे गैरप्रकार निदर्शनास आल्यास निवडणूक विभागाच्या एफएसटी टीमला माहिती देण्यात यावी, याची छाननी करून कारवाई केली जाईल. कोणत्याच राजकीय पक्षाच्या दबावाखाली यंत्रणा काम करत नसून कायद्यानुसार काम केले जात आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी पोलीस प्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद, डीसीपी रोहन जगदीश, प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी शुभम शुक्ला उपस्थित होते.

मतदान करण्यास 12 ओळखपत्रे

मतदान करण्यासाठी मतदारांना मतदान ओळखपत्रासह इतर 12 ओळखपत्रे वापरण्याची मुभा देण्यात आली आहे. आधारकार्ड, जॉबकार्ड, बँक-पोस्ट पासबुक, कामगार खात्याचे आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहन परवाना, पॅनकार्ड, एनपीआर अंतर्गत देण्यात आलेले आरजीआय स्मार्टकार्ड, भारतीय पासपोर्ट, फोटो असलेले पेन्शन प्रमाणपत्र, केंद्र-राज्य सरकार पीएसयु पब्लिक लि. कंपनीकडून देण्यात आलेले सेवा ओळखपत्र, खासदार, विधानपरिषद सदस्य, आमदार यांच्याकडून दिलेले अधिकृत ओळखपत्र, सामाजिक न्याय आणि सबलीकरण भारत सरकारकडून देण्यात आलेले विशेष आयडीकार्ड ओळखपत्र म्हणून वापरता येईल.

मतदान दिनी सार्वजनिक सुटी

मंगळवार दि. 7 रोजी होणाऱ्या मतदान दिनी सरकारी कार्यालयांसह शाळा-महाविद्यालयांना, उद्योग व्यवसायांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. या मतदारसंघात येणाऱ्या व्यापारी, उद्योजक आणि इतर संस्थांमध्ये काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी, रोजंदारी वेतनावर काम करणाऱ्या मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पगारी रजा देण्यात यावी, असा आदेश जारी करण्यात आला आहे.

Advertisement
Tags :

.