वक्फ बोर्ड विरोधात बेळगावात 1 डिसेंबरला जनजागृती आंदोलन
प्रतिनिधी / बेळगाव
वक्फ बोर्डाच्या कृती विरोधात भारतीय जनता पक्षाने राज्यभरातून आंदोलन चालविले आहे. येत्या 1 डिसेंबर रोजी बेळगावात जनजागृती आंदोलन होणार असून यामध्ये भाजप नेते मोठ्याने सहभागी होणार असल्याची माहिती आमदार व माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी दिली. जनजागृती आंदोलनाच्या निमित्ताने येथील एका हॉटेलमध्ये शुक्रवार दि. 29 रोजी झालेल्या पूर्वतयारी बैठकीमध्ये आमदार जारकीहोळी बोलत होते.
राज्यातील मठ, मंदिरे, शेतवड्यांवर वक्फ बोर्ड आपला हक्क सांगत असून यामुळे वक्फ बोर्ड विरोधात राज्यात संतापाची लाट उसळली आहे. वक्फ बोर्ड रद्द करा, अशी मागणी सर्वत्र जोर धरली आहे. बेळगावातील महात्मा गांधी भवनात रविवार दि. 1 डिसेंबर रोजी होणाऱ्या जनजागृती आंदोलनाच्या निमित्ताने भाजप नेत्यांनी जबाबदारीने कामे करावीत. बसनगौडा पाटील-यत्नाळ, प्रतापसिंह, सी. एम. सिद्धेश, अरविंद निंबावळी, कुमार बंगारप्पा, बी. पी. हरीश, एन. आर. संतोष यांसह राज्यातील अन्य अनेक नेते जनजागृती आंदोलनात सहभागी होणार आहेत. आंदोलनात सहभागी होणाऱ्यांची वाहने सरदार्स मैदानावर पार्क करण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. सकाळी 11 ते 5 या वेळेत होणाऱ्या जनजागृती आंदोलनात जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील जनतेने सहभागी होऊन यशस्वी करावे, असे आवाहन आमदार जारकीहोळी यांनी केले.
पूर्वतयारी बैठकीला नेते किरण जाधव, मुरघेंद्रगौडा पाटील आदी उपस्थित होते.