नवीन वर्षातील सार्वत्रिक, नैमित्तिक सुट्या जाहीर
बेळगाव : राज्य सरकारने 2025 मध्ये आपल्या कर्मचाऱ्यांसाठी सुट्यांची यादी जाहीर केली आहे. यादीमध्ये दुसरा शनिवार, चौथा शनिवार व रविवार यांचाही समावेश आहे. रविवारी प्रजासत्ताक दिन, गुढीपाडवा, मोहरमचा अखेरचा दिवस, महालय अमावस्या तसेच दुसऱ्या शनिवारी येणाऱ्या संत कनकदास जयंती यांचा समावेश करण्यात आलेला नाही. सार्वत्रिक रजेच्या काळामध्ये सरकारी कार्यालये बंद राहतील. अतिमहत्त्वाची कामे असल्यास संबंधित खात्याचे प्रमुख योग्य व्यवस्था करतील. मुस्लीम बांधवांच्या सणानिमित्त जाहीर करण्यात आलेल्या सुटीमध्ये फरक असल्यास त्यांच्या मागणीनुसार सुटीत बदल करून मुस्लीम बांधवांना त्यांच्या सणादिवशी सुटी देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. तूळ संक्रमण, हुत्तरी यासारखे सण राज्यातील फक्त कोडगू जिल्ह्यात साजरा होत असतो. या सणांना तेथील सरकारी कर्मचाऱ्यांना सुटी देण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याचे राज्य सरकारच्या मंत्रालयाने कळविले आहे.