बिघडलेल्या मनस्वास्थ्यासाठी मानसोपचारतज्ञांची मदत आवश्यक
-मनीषा सुभेदार, बेळगाव
अलीकडे केवळ मोठी माणसे किंवा तरुणवर्ग नाही तर अगदी लहान मुलेसुद्धा ‘मला टेन्शन आलंय’ असे सहजपणे म्हणून जातात. मोठी माणसे तर सतत ताण तणावाखाली वावरताना दिसतात. हा ताण नेमका कशामुळे येतो, याचे प्रत्येकाचे कारण वेगवेगळे असले तरी ताण आल्याने मानसिक आरोग्य आणि स्वास्थ्य बिघडते. दुर्दैवाने याचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. ताण कमी करणे, किंवा बिघडलेले मनस्वास्थ्य पूर्ववत करण्यासाठी मानसोपचार तज्ञांची मदत घेणे आवश्यक आहे. परंतु मानसोपचार तज्ञांकडे जाणे म्हणजे वेडसरपणा असणे नव्हे, हे बिंबविण्याचीसुद्धा नितांत गरज आहे. याच अनुषंगाने जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने काहेर विद्यापीठाच्या मानसिक आरोग्य विभागाच्या प्रमुख डॉ. यास्मिन एन. यांची घेतलेली मुलाखत...
मानसिक आरोग्य म्हणजे काय?
आपल्या आरोग्यामध्ये मानसिक आरोग्य हा एक घटक आहे. मानसिक, भावनिक, आध्यात्मिक या तिन्ही पातळ्यांवर आपले आरोग्य निरोगी असणे म्हणजेच मानसिक आरोग्य होय.
आज मानसिक समस्या वाढण्याचे कारण काय?
दुर्दैवाने समस्या पूर्वीही होत्या. परंतु आज आपला पर्यावरणीय भवताल त्याचे मुख्य कारण आहे. म्हणजेच कुटुंब, समाज, आसपासचे वातावरण, संस्कार, शाळेतील वातावरण यामध्ये झालेले बदल सुखावह नाही. यामध्ये मोबाईल या एका घटकाची भर पडली आहे. पूर्वी मोबाईल नव्हते. घरी आजोबा, आजी असत. रात्री नातवंडांना ते गोष्टी सांगत, त्या शक्यतो नैतिक मूल्ये रुजविणाऱ्या व प्रेरणादायी असत. त्याचाच विचार करत मुले झोपी जात. याला मानसशास्त्रामध्ये ‘स्टोरिड टेलिंग ऑफ पर्सनॅलिटी’ असे म्हटले जाते.
आज मात्र घरात, शाळेमध्ये मुलांच्यावर ताण असतो. याचे कारण पालकत्वाचा असमतोल होय. पालक किंवा शिक्षक आपले काही चुकते असा विचार करत नाहीत. आम्हाला सल्ला, उपदेश, समुपदेशन याची गरजच नाही, अशा भ्रमात ते आहेत. दुसरीकडे अत्यंत कडक शिस्तीमध्ये मुलांना ठेवले जाते. किंवा त्यांना मुक्त स्वातंत्र्य दिले जाते. या दोन्हींचा अतिरेक चुकीचा आहे. त्यामुळे समतोल पालकत्व महत्त्वाचे आहे.
संवादाचा अभाव हेसुद्धा मानसिक अनारोग्याचे कारण आहे का?
नक्कीच. पूर्वी लोक समाजात मिसळत, परस्परांशी संवाद साधत, कुटुंबात अनेक माणसे असत, त्यापैकी एका व्यक्तीची तरी मुले खुलेपणाने मन मोकळे करत होते. आज कुटुंबाची संख्या मर्यादित झाली. बाहेरचे जग सुरक्षित राहिले नाही. पालकांच्याकडे वेळ नाही. त्यामुळे मुलांची घुसमट होत असून त्यावर त्यांनी आपल्यापरीने शोधलेले उत्तर म्हणजे मोबाईल. नोकरदार पालकांकडे वेळेची मर्यादा आहे. तरीसुद्धा त्यांनी मुलांशी बोलत राहणे आवश्यक आहे.
मुलांवर येणाऱ्या ताणाची कल्पना पालकांना असते का?
कधी असते, कधी नसते. मुख्य म्हणजे आमच्याकडे येताना पालक गुगल सर्च करून येतात आणि तेथे दिलेली सर्व लक्षणे आपल्या मुलांच्या बाबतीत लागू पडतात, असे गृहीत धरून येतात. पण प्रत्येकाचे कारण आणि लक्षण वेगळे असू शकते. यावर त्वरित करता येण्याजोगी गोष्ट म्हणजे मुलांचे वर्तन याबाबत शाळेपासूनच समुपदेशनाची सुरुवात करणे होय.
नकारात्मकता ही मानसिक आरोग्य बिघडण्याचे कारण आहे का?
हो. मुले मागणी करतात, अपेक्षा ठेवतात, त्या पूर्ण केल्या नाहीत तर नकारात्मकता वाढते, त्यांना प्रत्येक गोष्ट झटपट हवी असते आणि त्याचा निकालही लगेच हवा असतो. मुलांमुळे पालकांमध्ये वाद उद्भवतात. मुलांच्या वर्तनामुळे आईवर भावनिक ताण येतो तर वडिलांना हृदयविकाराची समस्या जाणवते. मोबाईल दूर ठेवणे कठीण आहे, पण अशक्य नाही. हे पालकांनी समजून घेतले व तसे वर्तन केले तर मुले काही काळ तरी मोबाईलपासून दूर राहतील.
मानसिक अनारोग्यामुळे कोणत्या समस्या उद्भवतात?
सर्वप्रथम आपल्या पचनशक्तीवर त्याचा परिणाम होतो. निर्णयक्षमता, एकाग्रता यामध्ये ती व्यक्ती कमी पडते. झोपेवर परिणाम होतो, हळुहळू आसपास माणसे नकोत, असे त्याला वाटते. अशा व्यक्तीला हतबल वाटून त्याला कशाचीच आशा राहत नाही. कोणत्याही गोष्टीचा स्वीकार करणे त्याला जड जाते. मूल असेल तर पालकांपासून दूर जाते. पालक लोकांपासून दूर जातात. हळुहळू हे अंतर वाढत जाते व एक तुटलेपणाची भावना निर्माण होते.
मुलांच्यासाठी पालकांनी काय करणे अपेक्षित आहे?
बहुसंख्य घरांमध्ये पालक नोकरी करतात. शक्य असल्यास त्यांनी मुलांशी किमान संवाद ठेवणे आवश्यक आहे. बऱ्याचदा पालक बाहेरील वैताग मुलांवर काढतात. मोबईल वापरू नका, असे पालक सांगतात. परंतु मोबाईल नको तर काय करू, या मुलांच्या प्रश्नावर पालकांकडे उत्तर नाही. मुलांवर पूर्ण नियंत्रण ठेवणे ही अशक्य गोष्ट आहे. पण किमान त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे, ती नेमकी काय करत आहेत, याची चाचपणी करणे शक्य आहे. शाळांमध्येसुद्धा शिक्षकांना ही निरीक्षणे करणे शक्य आहे.
मुलांची आणि एकूण समाजाची व्यसनाधिनता कुटुंबातले मनस्वास्थ्य बिघडण्यास कारणीभूत आहे का?
ही फार चिंतेची बाब आहे. व्यसनाचे स्रोत कोठून येतात हे पाहणे महत्त्वाचे आहे. मारहाण करणे हा उपाय नाही. पालकांची व्यसनाधिनता मुलांवर प्रचंड परिणाम करते आणि दुर्दैवाने मूल घरापासून दूर जात आहे, कुटुंबाचे स्वास्थ्य बिघडवत आहे, संवाद हरवतो आहे हे लक्षात येऊनही पालक व्यसन सोडत नाहीत. तेव्हा आपल्यापेक्षा व्यसन महत्त्वाचे आहे, अशी मुलांची मानसिकता होते व कुटुंब दुभंगू लागते. शेवटी मूल की व्यसन हे ज्याचे त्याने ठरविणे भाग आहे. व्यसनग्रस्त कुटुंबातून येणाऱ्या मुलांच्या समस्या वेगळ्या आहेत. शिवाय अत्यंत ताणाखाली असणारे मूल भावनिकदृष्ट्या कमकुवत होते. भय, आत्महत्येचा विचार येणे, आत्मविश्वास हरवणे, एकाकीपणा येणे, आक्रमक किंवा अतिरेकी वर्तन करणे, असुरक्षित वाटणे, निद्रानाश होणे, ही सर्व मानसिक आरोग्य बिघडल्याची लक्षणे आहेत. ही मुलांना तसेच व्यक्तीलाही लागू होतात.
ताण घेऊ नये असे ठरविले तरी ताण येतो अशा वेळी काय करावे?
ताण दोन प्रकारचे असतात. वैद्यकीय परिभाषेत युस्ट्रेस (eustress)) हा आवश्यक असतो, ज्याची आपल्याला गरज आहे. त्या ताणामुळे आपण निर्मितीक्षम असे काही करू शकतो. परंतु डिस्ट्रेस हा ताण नकारात्मकता वाढवतो. तो मानसिक आणि भावनिक दोन्ही स्तरांवर परिणाम करतो. सकारात्मक ताण ऊर्जा देतो, त्यामुळे हा ताण एका प्रमाणात घेण्यास हरकत नाही.
योगावर केली पीएच. डी.
डॉ. यास्मिन यांनी ‘इम्पॅक्ट ऑफ योगा प्रॅक्टीस ऑन स्किल्स इनव्हॉल्वड इन मॅनेजेरीयल प्रॅक्टीसीस’ या विषयावर पीएच. डी. केली आहे. मानसशास्त्र या विषयात त्यांनी पदविका घेतली आहे. शिवाय योगतज्ञ आहेत. अष्टांग योगअंतर्गत ‘ओपन आय मेडिटेशन’चा सराव त्या करतात व प्रशिक्षण देतात. विजापूरच्या कर्नाटक महिला विद्यापीठात त्यांनी काम केले. केंद्र सरकारच्या प्रकल्पावर समन्वयक म्हणून काम केले. 2014 पासून त्या केएलई अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च येथील मानसिक आरोग्य विभागाच्या प्रमुख आणि समुपदेशक म्हणून काम करतात. योगाचा सराव शरीर सुदृढ राहण्यासाठी केला जातो तर मानसिक स्वास्थ्यासाठी प्राणायाम महत्त्वाचा. कार्यालयातसुद्धा आपल्याला त्याचा सराव करणे शक्य आहे, असे त्या सांगतात. त्यांनी हिमाचल प्रदेशातील 19 बॉर्डर पाँईट्सवरील लष्करी अधिकारी व जवानांसाठी मानसिक स्वास्थ्याचे प्रशिक्षण दिले आहे.
मोफत समुपदेशन
काहेर विद्यापीठाच्या मानसोपचार विभागातर्फे शाळा शाळांमध्ये पथनाट्यांसह सादरीकरण करून मानसिक आरोग्याबद्दल समुपदेशन केले जाते. याशिवाय शहरातील विविध ठिकाणीसुद्धा जागृतीपर कार्यक्रम घेतले जातात. दर शनिवारी सकाळी 10 ते 12 या वेळेत समुपदेशन केले जाते. या सर्व सुविधा पूर्णत: विनामूल्य आहेत. शाळा व गरजूंना याचा लाभ घेता येईल.