पीएसजी सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन्स लीग विजेता
वृत्तसंस्था, बुडापेस्ट
पॅरिस सेंट जर्मेन संघाने (पीएसजी) सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद पटकाविले. या स्पर्धेतील झालेल्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात पीएसजीने अर्सेनलचा 4-3 अशा गोलफरकाने पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव केला.
चॅम्पियन्स लीग स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा जेतेपद मिळविणाऱ्या पीएसजी हा युरोपीयन चॅम्पियन संघ ठरला आहे. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात निर्धारित वेळेत दोन्ही संघ 1-1 असे गोलबरोबरीत होते. त्यानंतर जादा कालावधीतही ही कोंडी कायम राहिल्याने पंचांनी पेनल्टी शूटआऊटचा अवलंब केला. पेनल्टी शूटआऊटमध्ये पीएसजीने अर्सेनलचा 4-3 अशा गोलफरकाने पराभव केला. गेल्या वर्षी या स्पर्धेतील अंतिम सामन्यात पीएसजीने इंटर मिलान संघाचा 5-0 अशा गोलफरकाने एकतर्फी पराभव केला होता.
शनिवारच्या अंतिम सामन्यात 6 व्या मिनिटाला अर्सेनलचे खाते केई हॅवर्झने उघडले. मध्यंतरापर्यंत अर्सेनलने पीएसजीवर 1-0 अशी आघाडी मिळविली होती. 65 व्या मिनिटाला उस्मान डेम्बेलेने पेनल्टीवर शानदार गोल करुन पीएसजीला बरोबरी साधून दिली. या स्पर्धेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच 10 वर्षांनंतर अंतिम सामना जादा वेळेपर्यंत खेळविण्यात आला होता. अर्सेनल गेल्या 22 वर्षापासून जेतेपद मिळविण्यासाठी प्रयत्न करीत होता. पण यावेळी पुन्हा एकदा पराभव झाल्याने त्यांची प्रतीक्षा आणखी वाढली आहे.