भारतावर हल्ला करण्यासाठी चिथावणी
चीन दौऱ्यावर असताना बांगला देशच्या मोहम्मद युनुस यांचे उपद्व्याप, भारताने उडविली खिल्ली
वृत्तसंस्था/ ढाका, बिजींग
चीनने भारतावर हल्ला करुन भारताचा भूभाग ताब्यात घ्यावा, अशी अप्रत्यक्ष चिथावणी बांगला देशचे नेते मोहम्मद युनुस यांनी चीनला दिली आहे. ते चीनच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर असताना त्यांनी भारताविरोधात गरळ ओकले आहे, असे वृत्त आहे. भारताची ईशान्येकडची सात राज्ये विलग आहेत. त्यामुळे चीनला संधी असून त्याने आपला विस्तार या भागात करावा, असे उघड आवाहन मोहम्मद युनुस यांनी केले. त्यांच्या या उचापतखोर विधानांचा व्हिडीओही प्रसिद्ध करण्यात आला आहे. भारताने त्यांच्या विधानांची गंभीर नोंद घेतानाच त्यांचा तोल सुटला असल्याची प्रतिक्रिया देत त्यांच्या विधानांची खिल्ली उडविली आहे.
भारताची सात राज्ये सागरतटवंचित आहेत. त्यामुळे बांगला देशच या भागाच्या समुद्री रखवालदार आहे. आमच्याशिवाय येथे कोणालाही स्थान नाही. चीनने याचा लाभ उठवावा आणि आपला विस्तार या भागात करावा. या भागात चीनने विस्तार केल्यास त्याचा आर्थिक लाभ होईल. चीन येथे आपली उत्पादने तयार करु शकेल, ती या भागात, तसेच जगात विकू शकेल, अशीही मुक्ताफळे मोहम्मद युनुस यांनी उधळली आहेत. चीनने तैवानही ताब्यात घ्यावा, असे विधान त्यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. आता त्यांनी भारताविरोधात चीनला चिथावणी दिली आहे.
चीन दौऱ्यावर प्रक्षोभक विधाने
दोन दिवसांपूर्वी युनुस यांचा चार दिवसांचा चीन दौरा आटोपला आहे. या दौऱ्यात त्यांनी चीनच्या विस्तारवादाला प्रोत्साहक ठरतील अशी विधाने केली आहेत. त्यांनी चीनला पाणीवाटपाचे 50 वर्षांसाठी व्यवस्थापन करावे, अशी सूचानही केली आहे. या पाणी व्यवस्थापनात भारत आणि बांगला देश यांच्यामधून वाहणाऱ्या तीस्ता नदीचाही समावेश आहे. वास्तविक या नदीचा चीनशी संबंध नाही. तरीही युनुस यांनी चीनला मधे ओढण्याचा प्रयत्न चालविला आहे.
भारताकडून खिल्ली
भारताने युनुस यांच्या विधानांना गंभीरपणे घेतानाच त्यांची खिल्लीही उडविली आहे. भारताची सात राज्ये सागरविहीन आणि भूमीने बंदीस्त झालेली आहेत, हे विधान हास्यास्पद आहे. बंगालच्या उपसागरावर प्रभाव केवळ बांगला देशचा आहे, हे विधानही अशाच प्रकारचे आहे. बांगला देशने सागरी वर्चस्वाचा जो दावा केला आहे, तो भारताने केव्हाच नाकारला आहे. आपल्या क्षमतेची बांगला देशलाही कल्पना आहे. त्यामुळे त्याच्या फुशारक्या व्यर्थ आहेत, असे स्पष्ट करण्यात आले.
गुंतवणुकीसाठी आमंत्रण
चीनने बांगला देशात गुंतवणूक करावी, असे आवाहन युनुस यांनी केले. बांगला देशातील बंदरांचेही चीनने व्यवस्थापन करावे, अशी त्यांची सूचना आहे. यावरुन बांगला देश चीनच्या कर्जविळख्यात अडकण्याचा आत्मघाती प्रयत्न करीत आहे, अशी टीका भारताने केली. आपल्या विधानांचे परिणाम काय होतील, याचा कोणताही विचार युनुस यांनी केलेला दिसत नाही. त्यांची विधाने गंभीर असून ती प्रादेशिक आंतरराष्ट्रीय समतोल बिघडविणारी आहेत. या विधानांमधून बांगला देशचा कोणताही लाभ होणार नाही, याची जाणीव मोहम्मद युनुस यांनी ठेवावी, असे मतप्रदर्शन या विषयातील विविध तज्ञांनीही केले आहे.
बांगला देशचा पाकिस्तान...
बांगला देशचा पाकिस्तान करण्याचा युनुस यांचा डाव आहे. ते त्यांच्या कृतीने दर्शवून देत आहेत. 1971 च्या युद्धात भारतीय सैनिकांनी आपले प्राण गमावून या देशात धर्मांध शक्तीना मोकळे सोडत आहेत, असे दिसून येत असून पुढच्या काळात भारताला पाकिस्तान आणि चीनच्या सीमेप्रमाणेच बांगला देशच्या सीमेवरही लक्ष केंद्रीत करावे लागणार, अशी शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे.
युनुस यांचा बिघाडीचा खेळ
ड पाकिस्तानचे अस्थायी नेते मोहम्मद युनुस यांची भूमिका भारतविरोधी
ड भारताच्या भूभागाचा चीनमध्ये उल्लेख करण्याचा युनुसचा नवा डावपेच
ड बांगला देशच्या बिकट आर्थिक स्थितीपासून लक्ष दुसरीकडे वेधण्याचा यत्न