धामणी धरणासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद
आमदार चंद्रदीप नरके यांची माहिती
कोल्हापूरः (वाकरे)
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात धामणी धरणासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती करवीरचे आमदार चंद्रदीप नरके यांनी दिली.
राई- कंदलगाव येथे ३.८५ टीएमसी क्षमतेच्या धामणी प्रकल्पाचे काम सुरू आहे. या धरणाची ७५ मीटर उंची आहे या प्रकल्पाच्या घळभरणीचा शुभारंभ तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला होता. घळभरणीचे ७० टक्के काम पूर्ण करण्यात आले आहे. येत्या पावसाळ्यात १.३० टीएमसी पाणीसाठा करण्यात येणार आहे. या धरण प्रकल्पाच्या नागरी सुविधा व उर्वरित कामासाठी १०० कोटी रुपयांचा निधी द्यावा, अशी मागणी आपण जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली होती असे आमदार नरके आणि सांगितले. सोमवारी झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थमंत्री अजित पवार यांनी १०० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. आगामी पावसाळ्यात या धरणात १.३० टीएमसी पाणी साठवण्यात येणार असून या पाण्याचा धरण क्षेत्रातील अनेक गावांना उपयोग होणार असल्याचे नरके म्हणाले. या निधी मंजुरीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे सहकार्य लाभले असल्याचे नरके म्हणाले.