For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सायकल टॅक देताहेत अपघाताला निमंत्रण

12:05 PM Dec 02, 2025 IST | Tarun Bharat Portal
सायकल टॅक देताहेत अपघाताला निमंत्रण
Advertisement

एपीएमसी मार्केट यार्ड रोडवरील चेंबरवरचे झाकण गायब :  महानगरपालिकेचे दुर्लक्ष 

Advertisement

बेळगाव : बॉक्साईट रोड क्रॉस येथील डॅमरो शोरुम ते एपीएमसी मार्केट यार्डकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला स्मार्ट सिटी योजनेतून सायकल ट्रॅक तयार करण्यात आले आहे. सदर सायकल ट्रॅक गटारीवर उभारण्यात आले असून विविध ठिकाणच्या चेंबरवरचे  झाकण गायब झाले असल्याने सायकल ट्रॅक अपघाताला आमंत्रण देणारे ठरले आहे. रात्रीच्यावेळी रस्त्याच्या कडेने चालत जाणाऱ्यांनाही धोका निर्माण झाला असल्याने याकडे महानगरपालिकेने लक्ष घालून सायकल ट्रॅकवरील चेंबरवर झाकण घालावेत, अशी मागणी केली जात आहे.

स्मार्ट सिटी योजनेतून शहर व परिसरात काँक्रीटचे रस्ते, गटारी, बस थांबे, पथदीप, हायमास्ट, आरओ प्लांट, तसेच वेगवेगळ्या ठिकाणी टपऱ्या उभारण्यात आल्या आहेत. स्मार्ट सिटीची कामे संपल्यानंतर हे सर्व प्रकल्प महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आले आहेत. कामांच्या देखभालीसाठी निधीही देण्यात आला आहे. मात्र महानगरपालिकेकडून सदर कामांच्या देखभालीकडे साफ दुर्लक्ष झाले आहे. अनेक ठिकाणी 24 तास पाणी योजनेसाठी रस्ते व सायकल ट्रॅक खोदले जात आहेत. त्यानंतर ते व्यवस्थितरित्या बुजविण्याऐवजी तसेच सोडून दिले जात आहेत. इतकेच नव्हे तर सायकल ट्रॅक केवळ नावालाच राहिले असून अनेकठिकाणी त्यावर फळ विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे.

Advertisement

महापालिकेला जाग कधी येणार?

विशेष म्हणजे बॉक्साईट रोड क्रॉसवरील डॅमरो शोरुम ते एपीएमसी यार्डकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोहोबाजूकडील सायकल ट्रॅकवरील चेंबरवर घालण्यात आलेली झाकणे गायब झाली आहेत. गेल्या काही महिन्यापासून ही परिस्थिती कायम असली तरी त्याकडे महानगरपालिकेने दुर्लक्ष केले असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. एखादी दुर्घटना घडल्यानंतरच महापालिकेला जाग येणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Advertisement
Tags :

.