मतदार यादी द्या, अन्यथा दूध संस्था अवसायनात
कोल्हापूर / धीरज बरगे :
जिल्ह्यातील मतदार यादी सादर करण्यास दिरंगाई करणाऱ्या सहाशे प्राथमिक दूध संस्था दुग्ध विभागाच्या रडारवर आहेत. सूचना, नोटीस देवूनही संबंधित संस्थांकडून मतदार यादी सादर केली जात नाही आहे. त्यामुळे आता सहाय्यक दुग्ध निबंधक अॅक्शन मोडवर आले असून त्यांनी मतदार यादी सादर करण्यासाठी 15 फेब्रुवारीपर्यंतचा अल्टीमेटम दूध संस्थांना दिला आहे. मुदतीत यादी सादर न केल्यास संस्था बंद आहे असे समजून दुग्ध विभागाकडून संबंधित दूध संस्था अवसायनात काढण्यात येणार आहे.
कोविड, लोकसभा निवडणुक आचार संहिता, निवडणुकीनंतर सुरु झालेला पावसाळा आणि त्यानंतर पुन्हा विधानसभा निवडणुकीची आचार संहिता अशा कारणांनी गेली वर्षभर सहकारी संस्थांच्या निवडणुकांना ब्रेक लागला आहे. मात्र आता जानेवारी सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे.
जिल्ह्यात सहा हजार 184 प्राथमिक दुध संस्था असून त्यापैकी 1665 दूध संस्था निवडणुकीच्या प्रतिक्षेत आहेत. 2021-22 पासुन निवडणुका थांबलेल्या संस्थांच्या निवडणुका तातडीने घेणे आवश्यक आहे. त्यामुळे निवडणुकीस पात्र असणाऱ्या संस्थांकडुन मतदार याद्या घेणे, निवडणुक कार्यक्रम लावण्याची तयारी दुग्ध विभागाकडुन सुरु आहे. मे 2025 पर्यंत प्रलंबित संस्थाची निवडणुक प्रक्रीया पूर्ण करण्याचे उद्दीष्ट आहे. पण काही संस्थांकडुन मतदार याद्या देण्यास कानाडोळा होत आहे.
- निवडणुक प्राधिकरणचा ऑनलाईन वॉच
निवडणुक प्राधिकरणचा दूध संस्थांच्या निवडणुकांवर ऑनलाईन वॉच आहे. एका क्लिकवर प्रत्येक संस्थेचे अपडेट मिळतात. त्यामुळे ज्या संस्थांनी याद्या दिलेल्या नाहीत,आशा संस्थांची नावे संबंधित जिल्ह्यातील दुग्ध विभागांना पाठवली जात आहेत. संबंधित संस्थांकडून वेळेत निवडणुक कार्यक्रम राबविण्याबाबत सूचना केल्या जात आहेत. त्यामुळे निवडणुक प्रक्रीयेपासुन कोणतीही संस्था सुटणार नाही आहे.
- आता थेट कारवाई होणार
निवडणुकीस पात्र असणाऱ्या दूध संस्थांना मतदार याद्या अद्यावत करुन त्या सादर करण्याबाबत वेळोवेळी पत्र, नोटीस पाठवून सूचना करण्यात आल्या आहेत. मध्यंतरी मतदार याद्या सादर न करणाऱ्या दूध संस्थांवर प्रशासकाची नेमणूक करण्याचा इशाराही देण्यात आला होता. मात्र मतदार याद्या सादर न केलेल्या दूध संस्थांची संख्या मोठी असल्याने सर्वच संस्थांवर प्रशासकाची नेमणूक करणे अशक्य असल्याने हि कारवाई थांबली गेली. मात्र आता मतदार यादी सादर करण्यासाठी 15 फेब्रुवारीपर्यंतची मुदत दिली असून मुदतीत यादी सादर करणाऱ्या संस्था अवसायनात काढल्या जाणार आहेत.
- अन्यथा दूध संस्था अवसायनात काढणार
जिल्ह्यातील सहाशे दूध संस्थांकडून मतदार याद्या देण्यास दिरंगाई होत आहे. वेळोवेळी सूचना करुनही त्यांच्याकडुन दूर्लक्ष केले जात आहे. यादी सादर करण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली आहे. यानंतरही यादी सादर न केल्यास संबंधित संस्था बंद आहे, असे समजून ती अवसायनात काढण्यात येणार आहे.
प्रदीप मालगावे, सहायक निबंधक (दुग्ध)
- मतदार यादी सादर न केलेल्या दूध संस्थांची तालुका निहाय आकडेवारी
तालुका दूध संस्थांची संख्या
आजरा 39
पन्हाळा 63
गगनबावडा 03
चंदगड 27
हातकणंगले 21
शिरोळ 22
शाहूवाडी 67
राधानगरी 77
भूदरगड 61
गडहिंग्लज 53
कागल 66
करवीर 103
एकूण 600