यात्राकाळात व्यत्यय न येता वीजपुरवठा करा
तारिहाळमध्ये होणाऱ्या श्री महालक्ष्मी यात्रेच्या पार्श्वभूमीवर हेस्कॉम अधिकाऱ्यांची बैठक
वार्ताहर/सांबरा
तारिहाळ येथे एप्रिल 2026 मध्ये होणाऱ्या श्री महालक्ष्मी यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेण्यात आली व बैठकीत गावातील विद्युत समस्यांचे यात्रेपूर्वी निवारण करण्याची मागणी करण्यात आली. येथील यात्रा दि. 21-4-2026 ते 29-4-2026 पर्यंत होणार आहे त्यानिमित देवस्थान कमिटीचे अध्यक्ष प्रमोद सूर्याजी जाधव यांच्या अध्यक्षतेखाली हेस्कॉम अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली.यात्राकाळात वीजपुरवठ्यात व्यत्यय येऊ नये, त्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली. तारिहाळ गावामध्ये 1976 मध्ये वीजपुरवठा सुरू झाला आणि तेव्हापासून विजेचे खांब आणि तारा बदलण्यात आलेल्या नाहीत.
त्यामुळे यात्रेपूर्वी तारा व विद्युतखांब बदलावेत, अशी विनंती करण्यात आली. तसेच गावामध्ये नवीन टीसी बसविण्याबाबतही चर्चा करण्यात आली. यावेळी हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांनी यात्राकाळात वीजपुरवठा करण्यासह विजेचे खांब आणि तारा बदलून देण्याचे आश्वासन दिले. बैठकीस कमिटीचे सदस्य यल्लाप्पा खनगावकर, यल्लाप्पा चिक्कलकी, पुंडलिक नाईक, रमेश कल्लन्नवर, राजू रागी-पाटील, स्वप्नील जाधव, गजानन नायिक, वीरूपाक्षी इटगी, सिद्दाप्पा खनगावकर व हेस्कॉमचे अधिकारी, पीडिओ व सेक्रेटरी उपस्थित होते.