न्हावेली गावासाठी स्वतंत्र वायरमन द्या
अक्षय पार्सेकर : वीज समस्यांनी ग्राहक हैराण
न्हावेली / वार्ताहर
न्हावेली गावात वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. याचा नाहक त्रास गावातील ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे न्हावेली गावासाठी स्वतंत्र वायरमन द्यावा अशी मागणी मनसे न्हावेली विभाग अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य अक्षय पार्सेकर यांनी केली आहे. सावंतवाडी वीज वितरण उपअभियंता श्री. चव्हाण यांच्याकडे मागणीचे निवेदन सादर केले. यावेळी मनसे उपजिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ तसेच तुकाराम पार्सेकर व ग्रामस्थ उपस्थित होते. पार्सेकर म्हणाले की, असा एकही दिवस जात नाही की वीज नाही. अनेकदा रात्री वीजपुरवठा खंडित झाला तर दुसऱ्या दिवशी रात्री पर्यंत बत्ती गुल असते. विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर याचा परिणाम होतो.
मुसळधार पावसामुळे विजेच्या तारा रात्री अपरात्री तुटून पडल्याने जीवित हानी घडू शकते. मंगळवारी रात्री असाच प्रकार घडला मात्र सुदैवाने जीवित हानी झाली नाही. विजेच्या तारा रस्त्यावर तुटून पडल्या होत्या. गावात वायरमन नसल्यामुळे अशा समस्या उद्भवतात. त्यामुळे गावासाठी स्वतंत्र वायरमन द्यावा अशी मागणी अक्षय पार्सेकर यांनी केली आहे. दरम्यान, वीज कार्यकारी उपअभियंता श्री.चव्हाण यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असे अक्षय पार्सेकर यांनी सांगितले.