स्वसाहाय्य गटातील महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून द्या
जि.पं.सीईओ राहुल शिंदे यांची अधिकाऱ्यांना सूचना
बेळगाव : ग्रामीण भागातील स्वसाहाय्य गटाच्या महिलांना स्वयंरेजगार उपलब्ध करून देण्यासाठी उपक्रम हाती घ्यावेत. स्वयंरोजगातून महिलांची आर्थिक स्थिती सुधारेल, याकडे लक्ष द्यावे, अशी सूचना जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) राहुल शिंदे यांनी केली. जिल्हा पंचायतीच्या सभागृहात बुधवार दि. 4 रोजी राष्ट्रीय ग्रामीण जीवनोपाय अभियान विकास आढ़ावा बैठक झाली. यामध्ये अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. कुक्कुट संजीविनी योजनेंतर्गत स्वसाहाय्य गटातील महिलांकडून प्रत्येक तालुक्याला देन कुक्कुटपाललन केंद्रे उभारावीत. मत्स्यपालनाचे प्रशिक्षण देण्यात यावे. आगामी पावसाळ्यात तलावांमध्ये स्वसाहाय्य गटांमार्फत मासे सोडून मत्स्यपालनाला प्रोत्साहन द्यावे. मासे विक्रीतून महिला गटांना आर्थिक बळ मिळणे शक्य होईल. समग्र कृषीसमूह, लखपती दीदि, वनधन विकास केंद्र आदी उपक्रमांतर्गत स्वसाहाय्य गटातील महिलांना रोजगार मिळवून देऊन त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्याचे प्रयत्न करावेत, अशा सूचनाही राहुल शिंदे यांनी अधिकाऱ्य़ांना केल्या. बैठकीला जिल्हा पंचायतीचे योजना संचालक रवी बंगारेप्पनवर, साहाय्यक योजनाधिकारी भाग्यश्री जहागीरदार, जिल्हास्तरीय विविध खात्याचे अधिकारी, सर्व तालुक्यांचे कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.